पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात ५०% नव्या चेहऱ्यांना संधी ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय मंत्री मंडळाने सोळावी लोकसभा बरखास्त करण्याची शिफारस राष्ट्रपती यांच्याकडे केल्यानंतर आता लवकरच पंतप्रधान मोदींचे नवीन सरकार स्थापन होणार आहे. या सरकारमध्ये मंत्रिपदाची लॉटरी कोणाला लागेल याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळात यावेळी पन्नास टक्के नवे चेहरे असतील, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात त्यांचे खंदे समर्थक अमित शहा यांना एक तर गृहमंत्री किंवा अर्थमंत्रीपद दिले जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. सतराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी मावळते गृहमंत्री राजनाथ सिंह यांची निवड केली जाण्याची चर्चा आहे. राजनाथ सिंह सोबतच लोकसभा अध्यक्षपदासाठी मावळते विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचेही नाव चर्चेत आहे. या दोन नावांव्यतिरिक्त पंतप्रधान मोदी लोकसभा अध्यक्षपदासाठी इतरही नाव पुढे करू शकतात, असेही म्हटले जात आहे. परंतु मोदींच्या नमंत्रिमंडळात यावेळी पन्नास टक्के नवे चेहरे असतील, अशी सूत्रांची माहिती आहे.