‘कोरोना’मुळे घर खरेदी-विक्रीच्या महसुलात 50 ते 60 % घट! !

पोलिसनामा ऑनलाईन – लॉकडाउनचा फटका घर खरेदी-विक्रीतून मिळणार्‍या महसुलाला बसला आहे. या महसुलात तब्बल 50 ते 60 टक्के घट झाली आहे. याचा परिणाम बांधकाम उद्योगालाही बसला आहे. दिवाळीपर्यंत ही स्थिती कायम राहील, असा अंदाज वर्तविला जात आहे.

मार्च महिन्यात मुंबईत घरांच्या खरेदी-विक्रीतून 350 कोटी महसूल मिळाला होता. मात्र एप्रिल महिन्यात तो शून्य झाला. मे महिन्यात फक्त 16 कोटी होता. जूनमध्ये 153 कोटी तर जुलै महिन्यात 214 कोटी रुपये इतका झाला. गेल्या वर्षी याच महिन्यातील महसुलाचा विचार केल्यास राज्याला तब्बल 60 ते 80 टक्के इतका फटका बसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. मुंबईत प्रत्येक महिन्याला 400 ते 600 कोटी रुपयांपर्यंत घर खरेदी-विक्रीतून मुद्रांक व नोंदणीच्या रूपाने महसूल मिळतो. मात्र टाळेबंदीमुळे मोठया प्रमाणात फटका सहन करावा लागला आहे. दरम्यान, लॉकडाउन शिथिलता आल्यानंतर मुंबईतील घरांच्या खरेदी-विक्री दस्तावेज नोंदणीत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. परिस्थिती पुर्वपदावर येण्यासाठी दिवाळी वा त्यापुढील कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे बांधकाम उद्योगालाही मोठया प्रमाणात रोकड टंचाई निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. राज्याला याद्वारे मिळत असलेल्या महसुलात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्याचा प्रामुख्याने महत्त्वाचा वाटा असतो. मंदीच्या खाईत असलेल्या बांधकाम उद्योगाला ही बाब दिलासा देणारी असली तरी ती पुरेशी नसल्याचे उद्योजकांनी सांगितले आहे .