51 शिक्षकांना गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून कारणे दाखवा नोटीस

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन  –  शाहूवाडी तालुक्यात कोरोना संसर्गित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबई, पुणे किंवा इतर ठिकाणांहून रेल्वे, बस, खाजगी वाहन अथवा अन्य कोणत्याही माध्यमातून तालुक्यात येणाऱ्या प्रवाशांना सरकारच्या दिशानिर्देशानुसार १४ दिवस विलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. अशा नागरिकांना ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्यात येणार असून, त्यासाठी तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालय, लॉज, रिसॉर्ट अधिकग्रहण करण्यात आले आहे.

या ठिकाणी सहनियंत्रकांचे कामकाज पाहण्यासाठी प्रशासनाकडून सुमारे पाचशे प्राथमिक शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. या शिक्षकांना तेथे काम करावे लागते. यामध्ये बाहेरगावरून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची रजिस्टरला नोंद घेणे, या व्यक्तींवर लक्ष ठेवणे, कोरोना संसर्गाचा प्रसार टाळण्यासाठी गावात फिरून जनजागृती करणे आदी कामे शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. मात्र, आदेश देऊनही यातील ७६ शिक्षक कामाच्या ठिकाणी हजर झाले नव्हते. याबाबत तहसीलदार गुरु बिराजदार यांनी संबंधित शिक्षकांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी उदय सरनाईक यांना दिले होते.

दरम्यान, शुक्रवारी (२९ मे) रोजी २५ शिक्षक हजर झाले. त्याच पार्श्वभूमीवर ५१ शिक्षकांना गटशिक्षणाधिकारी उदय सरनाईक यांनी करणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच चोवीस तासांमध्ये खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहे.