पत्रकार मारहाणप्रकरणी ६ जणांना अटक

दरोड्याचा गुन्हा दाखल

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – राहुरी येथील पत्रकार भाऊसाहेब येवले यांना मारहाण केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व राहुरी पोलिसांच्या संयुक्त पथकाने आतापर्यंत सहा जणांना ताब्यात घेतले आहे. त्यातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे, तर एकजण अल्पवयीन आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात बेकायदा जमाव जमवून दरोडा टाकून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज पहाटेपर्यंत आरोपी अटकसत्र पोलिसांकडून सुरू होते.

अटक केलेल्यांमध्ये विजय रामदास आहेर (वय २८,  रा. राजुरी ता. राहता, सध्या भिल्ल वस्ती, राहुरी), अक्षय भास्कर बर्डे (वय–१९, रा. बालाजी मंदीर, जुन्या बसस्टॅडजवळ, राहुरी), अमोल उत्तम माळी (वय-२४, रा. करमाळा, मु.पो.खडकी, सध्या रा. काटेवाडी, भिल्लवस्ती, राहुरी), प्रवीण रावसाहेब वाघ (वय-२२, रा. सरकारी दवाखान्यासमोर, राहुरी बु, ता. राहुरी), रामा रमेश माळी (वय-३३, रा. एकलव्य वसाहत, घर क. ८४, राहुरी बु, ता. राहुरी) व एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

याबाबत माहिती अशी की, येवले हे व्यवसायाने पत्रकार असून बुधवारी राहुरीतील पृथ्वी कॉर्नर येथे त्यांना गर्दी दिसली. म्हणुन  येवले यांनी तेथे जाऊन पाहीले. ते मोबाईल मध्ये सदर घटनेचे फोटो घेत असताना आरोपींनी येवले यांचा मोबाईल फोन बळजबरीने हिसकावून घेऊन त्याचे मोटारसायकलची चावी घेत चोरण्याचा प्रयत्न केला. तसेच पत्रकार येवले यांना काठीने व लाथाबुक्याने मारहाण करुन शिवीगाळ केली. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात येवले यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर राहुरी सह जिल्हाभरातील पत्रकार आक्रमक होताच पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलविली. पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांच्यासह अप्पर पोलिस अधीक्षक सागर पाटील, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार व राहुरीचे निरीक्षक हनुमंत गाडे यांनी घटना घडल्यापासून रात्रभर सदर प्रकरणी ऑपरेशन राबविले. त्यांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. त्यातील पाच जणांना अटक करण्यात आली तर एक मुलगा अल्पवयीन आहे. त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. आरोपींकडून गुन्ह्यात चोरलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.

प्रेस क्लबचे आंदोलन


पत्रकार भाऊसाहेब येवले यांच्या मारहाणीच्या निषेधार्थ अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने आज सकाळी पोलिस अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. शहरातील सर्व पत्रकारांनी सकाळी 11 वाजता पोलिस अधीक्षक कार्यालयात जमा व्हावे, असे आवाहन अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी केले आहे.