आयफोनचे आमिष दाखवून 7 जणांनी तब्बल सव्वासात लाख रुपयांचा घातला गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   आयफोनचा मोह एका तरुणाला चांगलाच महागात पडला असून, लकी ड्रॉमध्ये आयफोन लागल्याचे सांगत त्या तरुणाला सात जणांनी तब्बल सव्वासात लाख रुपयांचा गंडा घातला.

याप्रकरणी मुहंमद जुबरील, सरस्वती, सुप्रिया, रॉबर्ट लालदित्सक, सूरज शर्मा, संजय चव्हाण, कृष्णा नकाशा यांच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शुभम मोहन भापकर (वय २३) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम हडपसरमधील काळेपडळ येथे कुटुंबीयासह राहतात. काही महिन्यांपूर्वी आरोपी मुहंमद याने शुभमला मेसेज करून आयफोन फोन लागल्याची बतावणी केली. त्यानंतर त्याने स्वतःची गॅझेट लिमिटेड कंपनी असल्याचे शुभमला सांगितले. मुहंमदने संबंधित कंपनीचे कागदपत्रे शुभमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविले. त्यामुळे विश्वास बसल्याने शुभमने पहिल्यांदा २० हजार रुपये संबंधिताच्या बँक खात्यात वर्ग केले. त्यानंतर सात जणांनी वेळोवेळी शुभमला संपर्क करून फोन कस्टममध्ये अडकल्याची माहिती देत रक्कम उकळली. पैसे नसतानाही शुभमने मित्रांकडून उसने घेत संबंधितांच्या बँक खात्यावर वर्ग केले. सातत्याने पैशांची मागणी वाढल्यामुळे शुभमला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक एस. अडागळे करत आहेत.