Pune News : नाना पेठेत रूबाब ! आंदेकर टोळीकडून तरूणावर गोळीबार, कोंढवा पोलिसांकडून कृष्णराज आंदेकरसह 8 जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. आंदेकर टोळीने एका तरुणावर कोंढव्यात गोळीबार करत हत्येचा प्रयत्न केला. ‘आमच्या हद्दीत येऊन रुबाब दाखविल्याच्या’ रागातून हा गोळीबार करण्यात आला. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी कृष्णराज आंदेकर याच्यासह 8 जणांना अटक केली.

एक तरूण रात्रीच्या वेळी नाना पेठेतून दुचाकीवरून कोयते घेऊन गेला होता. याच राग आंदेकर टोळीतील काही गुन्हेगारांना आला. या रागातूनच आंदेकर टोळीतील कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (31), मुनाफ रियाज पठाण (23), ओमकार शिवप्रसाद साळुंखे (21), अनिकेत ज्ञानेश्वर काळे (25, हे सर्व रा. नाना पेठ) आवेझ आशफाक सय्यद (20, गणेश पेठ), विराज जगदिश यादव (25, हांडेवाडी रोड, आनंदनगर), अक्षय नागनाथ कांबळे (23, ससाणेनगर) आणि शाहवेज अब्दुल रशिद शेख (34, गुरुवार पेठ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

तर यामध्ये विघ्नेश अशोक गोरे (20, कात्रज) यांच्या मांडीला गोळी लागली.

गोरे व त्याचे मित्र ईश्वर म्हस्के, बिहारी भैया आणि अतुल दरेकर हे दुचाकीवरून जात असताना स्पोर्ट बाईकवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला. गोरे याच्या मांडीला गोळी लागल्याने तो जखमी झाला.

नाना पेठेतून आरडाओरड करत फिरत होते कोयते घेऊन

विघ्नेश गोरे आणि त्याचे मित्र 23 जानेवारीला रात्री दहाच्या सुमारास नाना पेठेतून कोयते हातात घेऊन आरडाओरड करून गेले होते. त्यावेळी त्यांनी एका स्टॉलवरील कृष्णराज आंदेकर याच्या आईचे पोस्टर कोयत्याने फाडले होते. ही बाब आंदेकर याच्या साथीदाराने त्याला सांगितली.

आपल्या एरियात येऊन रुबाब केल्याचा राग

आईचे पोस्टर कोयत्याने फाडल्याने आणि आपल्या एरियात येऊन रुबाब केल्याचा राग आंदेकरला आला होता. त्यामुळे त्याने गोळीबार केला.

8 जणांना अटक

कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शब्बीर सय्यद, तपास पथकातील सहायक पोलिस निरीक्षक चेतन मोरे, पोलीस उप निरीक्षक प्रभाकर कापुरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली.