‘त्या’ प्रकरणी नगराध्यक्षांसह तत्कालिन अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – कोपरगाव नगरपालिकेचा पाणी पुरवठ्याचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने जून २०१६ ते जुलै २०१७ दरम्यान पाणी टंचाईच्या काळात बनावट वाहने दाखवून दोन लाख १० हजार १७८ रुपये उकळले. बनावट कागदपत्रांच्या आधारे देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी शिल्पा दरेकर, नगराध्यक्ष विजय सूर्यभान वहाडणे, माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक रवींद्र नामदेव पाठक, तत्कालीन पाणी पुरवठा अभियंता प्रकाश लोखंडे व ठेकेदार विलास दशरथ आव्हाड या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने कोपरगाव शहर पोलिसांना दिला आहे.

सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार कोपरगाव न्यायालयात या प्रकरणी दावा दाखल केला होता. न्यायालयाने या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

संजय काळे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, कोपरगाव नगरपालिकेतर्फे ठेकेदार विलास दशरथ आव्हाड (बेट) यास जून २०१६ ते जुलै २०१७ यादरम्यान पाणीपुरवठ्याचा ठेका तत्कालीन मुख्याधिकारी शिल्पा दरेकर व रवींद्र नामदेव पाठक यांच्या सहीने व संमतीने दिला होता. पाणीपुरवठ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर ठेकेदार आव्हाड याने नगरपालिकेला २ लाख १० हजार १७८ रुपयांचे बिल सादर केले. नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या संमतीने हे बिल अदा करण्यात आले.

प्रत्यक्षात दरेकर व पाणीपुरवठा अभियंता लोखंडे यांनी हे काम पूर्ण झाले किंवा नाही, आव्हाड यांनी दिलेले बिल व त्यासेाबतच्या कागदपत्रांची शहानिशा करणे आवश्यक असताना त्यांनी ती केली नाही व भ्रष्टाचाराच्या हेतूने बिल मंजूर केले.

फिर्यादी काळे यांनी माहिती अधिकारात विलास आव्हाड यांनी ज्या वाहनांनी पाणीपुरवठा केला त्याच्या रेकॉर्डची मागणी करून खात्री केली असता त्यात पाणी पुरवण्यासाठी मोटारसायकल, पिकअप, तसेच संजीवनी सहकारी साखर कारखान्याचा ट्रॅक्टर आदी क्रमांकांच्या वाहनांचा वापर केल्याचे निष्पन्न झाले. आव्हाड याने बनावट वाहने दाखवून खोटी कागदपत्रे तयार करून नागरिकांची फसवणूक केली, अशी फिर्याद काळे यांनी न्यायालयात दाखल केली. या प्रकरणी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला.

You might also like