दांडेकर पुलावर ४ जणांच्या टोळक्यांनी १५ गाड्या फोडल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दांडेकर पुलाजवळील आंबिल ओढा परिसरात रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या १५ गाड्यांवर दगडफेक करण्याचा प्रकार मंगळवारी रात्री ११ वाजता घडला. या प्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आंबिल ओढा येथील सर्व्हे नंबर १३२ येथील झोपडपट्टीत ही घटना घडली. या प्रकरणी टेम्पोचालक नेताजी डांगे यांनी फिर्याद दिली आहे. या तोडफोडीत १३ दुचाकी, १ मोटार आणि १ रिक्षाचे नुकसान झाले आहे.
शहरात रात्री अपरात्री किरकोळ कारणावरुन रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांवर दगडफेक करुन त्यांच्या काचा फोडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. झोपडपट्टी व दाट वस्तीच्या परिसरात या घटना सातत्याने घडत आहेत.

दांडेकर पुलाजवळील सर्व्हे नंबर १३२ येथील झोपडपट्टीमध्ये बाहेर दुचाकी वाहने लावण्यात आल्या होत्या. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ४ जणांचे टोळके आता लोखंडी रॉड घेऊन आले होते. त्यांनी आल्या आल्या रस्त्याकडेच्या दुचाकी गाड्या फोडण्यास सुरुवात केली. त्याचा आवाज ऐकून नेताजी डांगे हे बाहेर आले. त्यांनी मुले गाड्यांची तोडफोड करीत असल्याचे पाहून आरडाओरडा केला. तेव्हा लोक घरातून बाहेर आले़ हे पाहून हे चौघेही जण पळून गेले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज पाहून तोडफोड करणाऱ्या चौघांची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. ही मुले परिसरातीलच असल्याचा पोलिसांचा संशय आहे. दत्तवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –