लोकसभेसोबतच महाराष्ट्र, हरियाणा विधानसभा निवडणुकांची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यांत लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांनी विधानसभा निवडणुक होणार आहेत. पण दोन्ही राज्यांत सध्या भाजपविरोधी सूर असल्याने लोकसभेच्या निवडणुकांमध्येच या दोन्ही राज्यांच्या निवडणुका घेतल्यास यश मिळू शकते, असा भाजपचा अंदाज आहे. त्यामुळे या दोन राज्यांच्या निवडणुक लोकसभेसोबत घ्याव्यात, अशी भाजपची इच्छा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकत्रित निवडणुकांसाठी आग्रही असल्याने या निवडणुका एकत्रित घेतल्या जाऊ शकतात.

महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये २०१४ च्या ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी मोदी लाटेवर स्वार होत अनेक नवखे उमेदवारही जिंकून आले. यानंतर भाजपने दोन्ही राज्यात सत्ता स्थापन केली होती. मात्र, या दोन्ही राज्यांमध्ये भाजपने मतदारांच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या नाहीत. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये या राज्यांमध्ये भाजपला मागच्या सारखे अनुकुल वातावरण नाही. लोकसभेसोबत दोन्ही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकां घेतल्यास भाजपचे कमीत कमी नुकसान होईल आणि सत्तेत परतणे सोपे होईल असे, भाजपनेतृत्वाचे मत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह आहे. पण लोकसभा निवडणुकीत भाजप घसरल्यास त्याचा परिणाम या दोन्ही राज्यांवर होऊ शकतो, हेही कारण एकत्र निवडणुका घेण्यामागे आहे.

हरियाणामध्ये मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचे नेतृत्व भाजपला सत्ता परत मिळवून देण्यास असमर्थ ठरणार असल्याची भावना आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले असले, तरी भाजप आणि शिवसेना यांच्यात संभाव्य युतीवरून निर्माण झालेला संशय आणि युती झाल्यास विधानसभेच्या जागावाटपाचा घोळ मुदतपूर्व विधानसभा निवडणुकीसाठी कारणीभूत ठरत आहे. जागावाटप आणि युतीचा परस्परसंशय संपविण्यासाठी लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र घेणेच सोयीस्कर ठरेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारले असता, त्यांनी मात्र महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुक लोकसभेसोबत होणार नाहीत, असे म्हटले आहे.