सोन्याच्या चेनचा मोह आवरला नाही, तिघांनी मिळून केली मित्राची हत्या

गोवंडी (मुंबई) : पोलीसनामा ऑनलाइन – दारुच्या नशेत मित्राच्या गळ्यातील सोन्याची चेन मिळवण्यासाठी तिघांनी मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना गोवंडी येथे घडली. आरोपींनी मित्राच्या गळ्यात असलेल्या ६० हजार रुपयाच्या चेनसाठी हत्या केल्याचे तपास उघड झाले आहे.पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून यामध्ये एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २ डिसेंबरला अविनाश दिलपे (वय-२६), कृष्णा सुतार आणि १६ वर्षीय अल्पवयीन तरुणाने राजू गायकवाडला दारु पिण्यासाठी बोलावलं होतं. यावेळी तिघांनी राजू गायकवाड याच्यावर हल्ला करत त्याच्या गळ्यातील चेन काढून घेतली आणि खाडीत ढकलून दिले अशी माहिती तपास अधिकारी विलास दायगुडे यांनी दिली आहे.

दुसऱ्या दिवशी राजू गायकवाड यांच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद केली. ७ डिसेंबरला यल्लो गेटला एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला असल्याची माहिती पोलीस कंट्रोल रुमला देण्यात आली. ‘कॉन्स्टेबल सुयोग कुलकर्णी यांनी राजू गायकवाड यांच्या कुटुंबाला मृतदेहाचा फोटा दाखवला असता त्यांच्या पत्नीने ओळख पटवली’, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी शशिकांत माने यांनी दिली आहे.

‘गायकवाड यांच्या पत्नीला १६ वर्षीय आरोपीच्या भावाने ते घसरुन खाडीत पडले असतील अशी शक्यता बोलून दाखवली. यावरुन आम्हाला संशय आला आणि आम्ही अल्पवयीन तरुणाची चौकशी केली असता त्याने सगळा प्रकार सांगितला’, असं शशिकांत माने यांनी सांगितलं आहे.