…म्हणजे ही तर फसवाफसवी : शरद पवार

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्र्याच्या जवळचे लोक आरक्षणाविरोधात याचिका दाखल करतात. ही फसवाफसवी आहे. अशी टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. बारामती येथे माध्यमांशी बोलतांना त्यांनी ही टीका केली.

भाजपा सरकारची मराठा, मुस्लीम,धनगर आरक्षणाचा निर्णय घेतो म्हणून झुलवत ठेवायचे आणि घेतलेले कोणतेच निर्णय कोर्टात टिकू द्यायचे नाहीत अशी भूमिका आहे. आणि मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणारे वकीलही नागपूरचे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच त्यांना राज्याचे अ‍ॅड. जनरल म्हणून नेमले होते. मात्र नंतर त्यांनी राजीनामा दिला आणि वकिली सुरू केली. त्यांना वकिली करण्याचा अधिकार आहे, त्यांच्याबद्दल माझे काही म्हणणे नाही. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच जवळचे लोक आरक्षणाविरोधात याचिका दाखल करतात. ही सरळसरळ फसवाफसवी आहे. असे शरद पवार यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागील निवडणुकीत अच्छे दिनचे आश्वासन दिले होते. आणि आता राष्ट्रीयत्वाचा मुद्दा पुढे करीत आहेत. राष्ट्रवादाचे प्रश्न काढून मूळ विषयाला विचलित करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. हे निषेधार्ह आहे. असेही त्यांनी म्हंटले.

याचबरोबर मोदी जवानांच्या शौर्याचा लाभ राजकारणासाठी करत आहेत. त्यांच्या नावावर मते मागत आहेत. मात्र बुलढाण्यात राठोड नावाचे जवान शहीद झाले होते. त्यांच्या अंत्यविधीवेळी पंतप्रधान तेथून अवघ्या ४० किलोमीटरवर होते. देशासाठी शहीद झालेल्या जवानाला, त्याच्या कुटुंबियांना भेटावे, कुटुंबियांचे सांत्वन करावे, असे त्यांना त्यावेळी वाटले नाही. असेही त्यांनी म्हंटले.