कौतुकास्पद ! अक्कलकोटमध्ये मंदिर-मशिदीच्या लाऊडस्पीकरवर भरते मुलांची शाळा

पोलिसनामा ऑनलाईन –  कोरोनामुळे काही महिन्यांपासून शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी डिजीटल माध्यमाद्वारे मुलांचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील बादोले गावातील के.पी.गायकवाड माध्यमिक शाळेत शिकवणार्‍या मयुर दंतकाळे शिक्षकाने गावातील मंदीर आणि मशिदीच्या लाऊडस्पीकरवरुन मुलांना पाढे आणि कविता शिकवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

ग्रामीण भागात पालकांची आर्थिक परिस्तिती बेताची असल्यामुळे मुलांना स्मार्टफोन घेणे शक्य नाही. त्यामुळे मयुर दंतकाळे शिक्षकाने मशिदीच्या लाऊडस्पीकरवरुन मुलांना पाढे आणि कविता शिकवण्याचा मानस व्यक्त केला. सुरुवातीला शिक्षकांनी गावातील मुलांचा सर्व्हे करत किती जणांकडे स्मार्ट फोन आहे याचा आढावा घेतला. या सर्वेक्षणात फक्त 90 मुलांकडे स्मार्टफोन असल्याचे समजले. काही मुलांच्या पालकांकडे फक्त कॉलिंगची सुविधा असलेला तर काही मुलांच्या पालकांकडे फोनच नव्हता. त्यामुळे मुलांच्या अभ्यासात खंड पडू नये याकारणासाठी गावातील मंदिर आणि मशिदीच्या लाऊडस्पीकरवरुन मुलांना धडे शिकवायचे ही कल्पना दंतकाळे यांना सुचली. मुलांचाही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. शाळेत असताना कधी एकदा सुट्टीचा दिवस येतोय असे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत आहे. उपक्रमाव्यतिरीक्त मयुर दंतकाळे यांनी गेल्या काही वर्षांपासून पत्रलेखनाची चळवळ सुरु केली आहे. महाराष्ट्रातील मान्यवर व्यक्ती, लेखक यांना मुलांकरवी पत्र लिहून, त्यांचे अभिप्राय ते मुलांना वाचून दाखवतात. या उपक्रमाचा सध्याच्या घडीलाही त्यांना चांगलाच फायदा झाला. विद्यार्थ्यांशी दररोज भेट होत नसल्यामुळे कधीकधी दंतकाळे पत्राद्वारे मुलांशी संवाद साधतात आणि त्यांचे विद्यार्थीही त्यांना तितकाच चांगला प्रतिसाद देतात.