मुंबईत पोलिस व्हॅनमध्येच महिलेने दिला बाळाला जन्म

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णांचे आकडे रोज नवे विक्रम गाठताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत गेल्या वर्षभरापासून पोलीस, डॉक्टर, सर्वच अत्यावश्यक सेवा देणारे कमर्चारी प्रयत्नाची पराकाष्ठा करताना दिसून येत आहेत. अशातच मुंबईत नुकत्याच घडलेल्या एका घटनेमुळे मुंबई पोलिसांची कर्तव्यदक्षता दिसून आली आहे. एका गरोदर महिलेला रस्त्यातच प्रसूतीच्या वेदना सुरु झाल्या. त्‍यावेळी आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांनी रुग्णवाहिका येण्याची वाट न पाहता महिलेला आपल्या वाहनात घेतले अन् व्हॅनमध्येच महिलेची प्रसूती झाली. वरळी नाका येथे खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडवणारा प्रसंग घडला आहे.

वरळीनाका परिसरातून जात असताना एका महिलेला रस्त्यातच प्रसूती वेदना सुरु झाल्‍या अन् ती रस्त्यावर कोसळली. लोकांनी पोलिस कंट्रोल रूमला फोन केला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्या ठिकाणी तातडीने धाव घेतली. पोलिसांनी क्षणाचाही विचार न करता त्या महिलेला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी पोलिस व्हॅनमध्य़े बसवले. पोलिस व्हॅनमध्येचं महिलेने बाळाला जन्म दिला. नंतर तिला आणि बाळाला रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे महिलेला योग्य व वेळेवर मदत मिळाली. पोलिसांनी केलेल्या या कामगिरीबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.