आम आदमी पार्टी राज्यात लोकसभा, विधानसभा लढवणार

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन

आगामी लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लढवण्याचा विचार आम आदमी पार्टीने सुरू केला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचे चित्र बदलू शकते.

आम आदमी पार्टीच्या राज्य समन्वय समितीची स्थापना नुकतीच करण्यात आली. समितीचे राज्य समन्वयक निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी रविवारी पहिली बैठक पुण्यात घेतली तसेच बैठकीनंतर प्रमुख कार्यकर्त्यांची सभाही घेतली या सभेत बोलताना सावंत यांनी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवण्याचा मनोदय जाहीर केला.

आम आदमी पार्टीने सध्या मध्यप्रदेश आणि राजस्थानच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यातही मध्यप्रदेशवर जास्त भर दिला असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. पक्षाच्या केंद्रीय समितीने मंजुरी दिल्यास आम आदमी पार्टी ताकदीने उतरेल. सध्या सावंत यांनी निवडणूक लढण्याचे संकेत देऊन वातावरण निर्मिती केली आहे.

सन २०१४ मध्ये आम आदमी पार्टीने लोकसभेच्या मोजक्या जागा लढवल्या होत्या त्यात पुण्यातही निवडणूक लढवली होती. मात्र, त्यानंतर महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून हा पक्ष दूर राहीला. दरम्यान संघटनेच्या पातळीवरही पक्षात पोकळी झाली होती हे लक्षात घेऊन अलीकडेच पक्षाच्या केंद्रीय समितीने राज्यात समन्वय समिती नेमून पक्ष विस्तारास सुरूवात केली आहे. दिल्लीतील ‘आप’च्या सरकारने राबवलेल्या लोककल्याणकारी कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. शेतकरी, शहरातील असंघटीत आदींचे प्रश्न हाती घेऊन हा पक्ष विस्ताराच्या मोहीमा राबवणार आहे.