महत्वाचं ! भविष्यात ‘आरोग्य सेतू’ App चा वापर E-Pass म्हणून केला जाऊ शकतो

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारत सरकारने लोकांना कोरोनापासून बचावासाठी आरोग्य सेतू नावाचे अ‍ॅप लाँच केले होते. या अ‍ॅपला एका आठवड्यात जवळपास दोन कोटीपेक्षा अधिक लोकांनी डाउनलोड केले होते. जर आपण संशयित भागात प्रवेश केला तर या अ‍ॅपद्वारे सूचित केले जाते. हे एक लोकेशन आधारित कोरोना विषाणू ट्रॅकर अ‍ॅप आहे. या अ‍ॅपचा उपयोग ई-पास म्हणून देखील केला जाऊ शकतो.

या अ‍ॅप बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आरोग्य सेतू हे अ‍ॅप कोरोनाविरूद्धच्या लढाईत एक परिणामकारक शस्त्र आहे. तसेच या अ‍ॅपचा उपयोग कुठेही जाण्यासाठी ई-पास म्हणून केला जाऊ शकतो असे देखील त्यांनी स्पशर केले. तसेच या आरोग्य सेतू अ‍ॅपला मोठ्या प्रमाणात डाउनलोड केले जावे असे आवाहन देखील पंतप्रधान मोदींनी केले आहे.

आरोग्य सेतू अ‍ॅपची वैशिष्ट्ये

आरोग्य सेतू अ‍ॅप आपण गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपलच्या स्टोअर वरुन विनामूल्य डाउनलोड करू शकता. या अ‍ॅपमध्ये प्रथम आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी लागेल. यानंतर आरोग्य सेतू अ‍ॅप आपल्याला आपल्या स्थानानुसार कोरोनापासून होणार्‍या धोक्याबद्दल इशारा देईल. विशेष म्हणजे या अ‍ॅपमध्ये ‘सेल्फ असेसमेंट टेस्ट’ वैशिष्ट्य देखील आहे. ज्याच्या साहाय्याने आपण इतरांना लक्षणे सांगू शकता आणि कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या बाबतीत माहीती देखील मिळवू शकता.

तसेच या अ‍ॅपचे खास वैशिष्ट्ये म्हणजे आपण सांगितलेल्या लक्षणांच्या आधारे आपल्याला चाचणी घेण्याची आणि डॉक्टरांशी संपर्क साधण्याची आवश्यकता आहे की नाही हे देखील या अ‍ॅपद्वारे सांगितले जाते. तसेच कोरोनाच्या संरक्षणासाठी सर्व केंद्रीय हेल्पलाइन क्रमांक देखील यामध्ये देण्यात आले आहेत. त्यामुळे आरोग्य सेतू अ‍ॅप हे खूप फायदेशीर आहे, त्यामुळे ते सर्वांनी डाउनलोड करणे देखील गरजेचे आहे.