१० लाखाची मागणी, पहिला हप्ता म्हणून २.५० लाख स्विकारताना ‘सिडको’चे २ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अडीच लाखांची लाच घेताना सिडकोचा विकास अधिकारी, भूमापक यांच्यासह एका खासगी व्यक्तीला अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे.

विकास किसन खडसे (वय ५२, (वर्ग3) भू मापक, नियंत्रक अनधिकृत बांधकाम विभाग, सिडको, रायगड भवन, सीबीडी नवी मुंबई), प्रीतमसिंग भगतसिंग राजपूत (वय ३९. (वर्ग 1)विकास अधिकारी, नियंत्रक, अनधिकृत बांधकाम विभाग सिडको, रायगड भवन सीबीडी नवी मुंबई), प्रदीप चंद्रकांत पाटील, (वय ३५) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

तक्रारदार हे करत असलेल्या इमारतीच्या बांधकामावर अतिक्रमण कारवाई न करण्या करीता तिघांनी १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर त्यांना तडजोडीअंती भुमापक याने दोन टप्प्यात ८ लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी याची तक्रार अँटी करप्शनकडे केली.

अँटी करप्शनच्या पथकाने ७ जून रोजी याची पडताळणी केली. तेव्हा त्यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तर विकास अधिकारी राजपूत यांनी त्याला लाच घेण्यास प्रोत्साहन दिले. त्यानंतर अँटी करप्शनच्या पथकाने सापळा रचला. त्यावेळी त्या दोघांच्या वतीने खासगी व्यक्ती प्रदिप पाटील याने तक्रारदार यांच्याकडून सोमवारी सायंकाळी चार वाजता अडीच लाख रुपयांची लाच स्विकारल्यावर रंगेहात पकडले.

ही कारवाई पोलीस उपअधिक्षक रमेश चव्हाण. कर्मचारी जाधव, ताम्हाणेकर, चव्हाण, माने, गायकवाड यांच्या पथकाने केली.