कनिष्ठ अधिकार्‍याकडून 2.50 लाखाची लाच घेताना वरिष्ठ अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – अमरावती जिल्ह्यात कनिष्ठ अधिकाऱ्याकडूनच वरिष्ठ अधिकाऱ्याने लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकाऱ्यास पहिल्या टप्यातील अडीच लाखांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले आहे. त्यांनी 5 लाखांची मागणी केली होती. राहत्या घरी त्यांनी लाच घेतली.

राजेंद्र गणेशराव बोंडे (रा. अमरावती) असे पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. राजेंद्र बोंडे हे वन विभागात विभागीय वन अधिकारी आहेत. दरम्यान यातील तक्रारदार हे आरोपी लोकसेवक यांचे कनिष्ठ अधिकारी आहेत. त्यांना लोकसेवक राजेंद्र यांनी सामाजिक वनीकरण वरुड जिल्हा अमरावती येथील अतिरिक्त कार्यभार दिला होता. येथील अतिरिक्त कार्यभार दिल्याचा मोबदला म्हणून राजेंद्र यांनी त्यांच्याकडे 5 लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. याबाबत त्यांनी एसीबीकडे तक्रार केली होती.

या तक्रारीची पडताळणी केली असता त्यात दोन टप्यात 5 लाख रुपये देण्याचे कबूल केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आज एसीबीच्या सापळा कारवाईत राजेंद्र यांना अडीच लाख रुपयांचा पहिला टप्पा घेताना रंगेहात पकडले आहे. राजेंद्र यांनी ही लाच त्यांच्या घरीच स्वीकारली आहे. दरम्यान एसीबीकडून त्यांच्या घराची झडती घेण्यात येत आहे. तर कनिष्ठ अधिकाऱ्याकडून लाच घेताना वरिष्ठ अधिकाऱ्याला पकडल्याने अमरावती जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

अमरावती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पोलीस उपअधीक्षक गजानन पडघन व पथकातील चंद्रशेखर दहिकर, सुनील वऱ्हाडे, अभय वाघ, चंद्रकांत जनबंधू यांच्या पथकाने केली आहे.