एक डुलकी प्राणाची आहुती ! ट्रक आणि ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात १ जागीच ठार, २६ जखमी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई-आग्रा महामार्गावार पारोळा रोड येथे ट्रक आणि ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात १ जणाचा मृत्यू झाला आहे तर २६ जण जखमी झाले आहेत. ही घटना चौफुली जवळ आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली.

मुंबई-आग्रा महामार्गावर पारोळा रोड चौफुली जवळ पुलावर कांदे भरलेला ट्रक (क्रं. एम एच 18/ ए ए 0952) स्टार्टर बिघडल्यामुळे महामार्गावरच उभा होता. त्यावेळी इंदौरहुन मुंबईकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने (क्रं. एम पी 09/एफ ए9787) उभा असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर २६ जण जखमी झाले. ट्रॅव्हल्स चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी दाखल होऊन क्रेनच्या मदतीने ट्रॅव्हल्स उभी करुन प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर जखमींना तातडीने बर्डी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी आझाद नगर पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशीरा पर्यत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.