पुण्यातील कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात ; लोखंडी पाईप पोटातून ‘आरपार’ गेल्याने तरुणाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे-बंगळुरू महामार्गावर झालेल्या टेम्पोच्या (एमएच १२ पीक्यू २८१४) भीषण अपघातात एका १७ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाला. तरुणाच्या पोटात सेफ्टी गार्डचा लोखंडी पाईप आरपार गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात आज दुपारी बाराच्या सुमारास नवीन कात्रज बोगद्याजवळ झाला. प्रीतम बालकिशन काकाणी (वय-१७ रा. कंटेवस्ती, शिवणे) याचा जागीच मृत्यू झाला तर टेम्पो चालक बालकिशन रामतरण काकणी (वय-५०) हे गंभीर जखमी झाले आहेत.

काकाणी हे टेम्पोमधून वेफर्स, कुरकुरे, फरसाण घेऊन पुण्याच्या दिशेने येत होते. दुपारी बाराच्या सुमारास कात्रज बोगद्यातून बाहेर पडण्याच्या अगदोर थोडा उतार आहे. या उतारावर बालकिशन यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या सेफ्टी गार्डच्या लोखंडी पाईपमधून टेम्पोची अर्धी बाजू आत गेली. त्यावेळी चालकाशेजारी बसलेल्या प्रीतमच्या पोटातून पाईप आरपार गेल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. तर चालकाला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे मार्शल तुकाराम कदम, दत्तात्रय खपाले, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कर्मचारी तसेच नांदेड सिटी अग्निशमन दलाचे कर्मचारी आदींनी त्वरित घटनास्थळी पोहचून मृत्यू झालेल्या तरुणाच्या पोटात गेलेला रॉड कापून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त