‘गंमत म्हणून राहुल गांधींच्या ‘बायोपिक’चा विषय काढला’ : सुबोध भावे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कार्यक्रम खेळता ठेवण्यासाठी गंमत म्हणून राहुल गांधींच्या चरित्रपटाचा विषय काढला अशा भावना अभिनेता सुबोध भावे याने व्यक्त केल्या आहेत. सुबोधने यासंदर्भात फेसबुकवर पोस्ट टाकली आहे. यावेळी आपण राहुल गांधींची भूमिका वेळ पडली तर साकारू शकतो असेही त्याने त्यात म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पुण्यात विद्यार्थी संवाद कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना सुबोधने राहुल गांधी यांचा बायोपिक करण्याचा उल्लेख केला होता. त्यावर आता सुबोधने स्पष्टीकरण दिले आहे.

आपल्या पोस्टमध्ये सुबोध म्हणतो की, “मी आजपर्यंत मोहन भागवत, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, रामदास आठवले या सर्वांना प्रेमाने भेटलो असून मला त्यांच्याबद्दल आदर आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनाही त्यांची मुलाखत घेण्याच्या निमित्ताने (जे माझं काम आहे) त्याच आदर आणि प्रेमाने भेटलो. त्यांना भेटून मला आनंद झाला. त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा.”

पुढे सुबोध म्हणतो की, “कार्यक्रम खेळता ठेवण्यासाठी गंमत म्हणून चरित्रपट करायचा विषय काढला. त्यांचं(राहुल गांधींचं) काम मी करू शकतो कारण कोणाच्या तरी म्हणण्याप्रमाणे मी भारतरत्न ए.पी.जे. अब्दुल कलाम सर, सेरेना विल्यम्स यांच्या भूमिका करू शकतो तर राहुल गांधींची भूमिका नाही ?” असा सवाल सुबोधने विचारला आहे.