अभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपप्रवेश, रामपूर मधून लढणार ?

नवी दिल्‍ली : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री जया प्रदा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या अखेर त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याबाबतची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जया प्रदा रामपूरचे सपा उमेदवार आजम खान यांच्‍याविरोधात निवडणूकीच्‍या रिंगणात उतरतील. याआधी जया प्रदा रामपूरच्या खासदार राहिल्या आहेत. त्यांनी रामपूर मतदार संघातून सपाकडून २००४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकांमध्ये त्यांना यश देखील मिळाले होते.

यावेळी बोलताना जया प्रदा म्हणाल्या, सिनेमा असो किंवा राजकारण असो, ते मी मनापासून स्‍वीकारले, असे जया प्रदा म्‍हणाल्‍या. आज भाजपमध्‍ये सन्‍मानाने प्रवेश करत आहे, त्‍याबद्‍दल भाजपचे आभार मानते. मी तेलगु देशममध्‍ये होते. नंतर चंद्राबाबू यांच्‍यासोबत काम केले. पुढे मी उत्तर प्रदेशात आले. येथे सपासोबत काम करण्‍याची संधी मिळाली. आज मला भाजपमध्‍ये प्रवेश करण्‍याची संधी मिळाली. त्‍याबद्‍दल धन्‍यवाद देते, असे त्‍या म्‍हणाल्‍या.

जया प्रदा यांनी १९९४ मध्‍ये तेलगू देशम पार्टीतून आपल्‍या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली होती. तेलुगू देशम पार्टीचे संस्थापक एन. टी. रामाराव यांनी त्‍यांना पक्षात प्रवेश करण्‍याचे निमंत्रण दिले होते. परंतु, जया प्रदा यांचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्‍याशी मतभेद झाल्‍यामुळे त्‍या तेलगू देशम पार्टीतून बाहेर पडल्‍या होत्‍या.