….म्हणून आदित्य ठाकरे छात्र परिषदेच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – छात्र परिषदेद्वारे मुंबईमध्ये विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यासंबंधीचा कार्यक्रम येत्या रविवारी पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी बहुचर्चित विद्यार्थी नेते उमर खालिद आणि जावेद अख्तर यांच्यासारखे अनेक प्रतिष्ठित व्यक्ती हजेरी लावणार आहेत. मात्र आमदार आदित्य ठाकरे हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत.

छात्र सेनेकडून आदित्य ठाकरे यांचे नाव देखील उपस्थितीमध्ये छापण्यात आले होते मात्र शिवसेनेकडून आदित्य ठाकरे हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अशा प्रकारचे एक ट्विट करत याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

काय म्हंटलय नेमकं ट्विटमध्ये
आम्हाला या कार्यक्रमाची माहिती नाही आणि युवासेनाप्रमुख, कॅबिनेट मंत्रीआदित्य ठाकरे यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत पुष्टी केलेली नाही. तरी आयोजकांनी जवळच्या शिवसेना कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

या कार्यक्रमामध्ये सीएए, एनआरसी विरोधात अनेक युवा चेहरे आणि प्रसिद्ध व्यक्ती आपली भूमिका मांडणार आहेत. यामध्ये उमर खालिद, जावेद अख्तर सह राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत.

राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे आणि आदित्य ठाकरे यांनी उमर खालिद यांच्यासोबत स्टेज शेअर केल्याने शिवसेनेची कोंडी होऊ शकते म्हणून आदित्य ठाकरे यांनी कार्यक्रमाला जाण्याचे टाळले असल्याचे सांगण्यात येते. तर शिवसेनेने याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे म्हंटले आहे. तर आयोजकांनी एका मराठी वृत्त वाहिनीवर बोलताना आदित्य ठाकरे यांच्या स्वकीय सहायकासोबत बोलणे झाल्याचे म्हंटले होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/