जळगावच्या कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेल्या रुग्णाचा मृतदेह आढळला, प्रचंड खळबळ

पोलिसनामा ऑनलाईन – अमळनेर येथील कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह नगरपालिकेसमोरील रस्त्यावर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी जिल्हाधिकार्‍यांनी गांभीर्याने दखल घेत तातडीने अहवाल मागविला आहे. सुनील दिलभर पाटील (वय 32) असे मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे.

आरोग्य विभागाने आयोजित शिबिरात सुनील पाटीलचा स्वॅब घेतल्यानंतर तो पॉझिटिव्ह असल्याचे उघडकीस आले होते. 9 तारखेला त्याला प्रताप महाविद्यालयात असलेल्या कोविड सेंटरला दाखल करण्यात आले होते. तेथे त्याला श्वसनाचा त्रास होत होता त्यात त्याच्या हाताला जखम असल्याने अधिकार्‍यांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात लक्षणे असलेल्या रुग्णांच्या कक्षात उपचारासाठी दाखल केले. काल सकाळी सुनील पाटील ग्रामीण रुग्णालयात दिसून आला नाही. त्यामुळे कर्मचारी व डॉक्टरांनी त्याचा शोध सुरू केला. पळून गेल्यामुळे त्याच्याविरुदध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर काल संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास सुनीलचा मृतदेह नगर पालिकेसमोर रस्त्यावर पडलेला आढळून आला. त्यानंतर रूग्णवाहिकेने ताबडतोब मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. नगरपालिका प्रशासनाच्या कर्मचार्‍यांनी त्याचा मृतदेह सापडलेली जागा सॅनिटाईज केली आहे.