1 डिसेंबरपासून गॅस सिलिंडर, इन्शुरन्स हप्ता, रेल्वे, RTGS चे नियम बदलणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजपासून बरोबर चार दिवसांनंतर म्हणजेच 1 डिसेंबर 2020 पासून देशात गॅस सिलिंडर, इन्शुरन्स हप्ता, रेल्वे आणि पैशांच्या व्यवहारांशी संबंधित नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. याचा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर मोठा परिणाम होणार आहे. नवीन नियामांमध्ये एकीकडे दिलासा मिळेल, तर दुसरीकडे काही गोष्टींची काळजी न घेतल्यास आर्थिक नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊ या नव्या बदलाबाबत.

गॅस सिलिंडर : दर महिन्याच्या सुरुवातीला तेल कंपन्या एलपीजी सिलिंडरचे दर विचारात घेतात. उद्यापासून घरगुती सिलिंडरची किंमत बदलण्यात येणार आहे. प्रत्येक राज्याच्या करांमध्ये फरक असतो, त्यामुळे तेथील दरही वेगवेगळे असतात. सध्या केंद्र सरकार एका कुटुंबाला वर्षाला 12 सिलिंडर सबसिडीवर देते. त्यापेक्षा जास्त सिलिंडर हवा असल्यास बाजारभावाने तो घ्यावा लागतो. ही किंमत दर महिन्याला आंतरराष्ट्रीय बाजारानुसार ठरविण्यात येते.

विमा हप्ता : कोरोना काळात लोकांनी मोठ्या प्रमाणावर विमा घेतला आहे. मात्र, त्याच्या हप्त्याची चिंताही वाढली आहे. आता पाच वर्षांनी विमाधारक त्यांच्या विम्याचा हप्ता कमी करू शकतात. ते हा हप्ता 50 टक्क्यांपर्यंत कमी करू शकणार आहेत. यामुळे विमाधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण निम्मा हप्ता भरून विमाधारक त्याची पॉलिसी सुरू ठेवू शकणार आहेत. यामुळे त्यांच्यावर जादा आर्थिक बोजा पडणार नाही.

RTGS नियम : आरबीआयने पैशांच्या व्यवहारामध्ये मोठा बदल केला आहे. ऑक्टोबरमध्ये ही घोषणा केली होती. आरटीजीएसद्वारे 1 डिसेंबरपासून 24 तास पैसे पाठविता येणार आहेत. यामुळे बँका उघडण्याची वाट पाहावी लागणार नाही. डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. आरटीजीएसद्वारे कमीत कमी दोन लाखांपर्यंत पैसे ट्रान्सफर करता येतील, तर दोन लाखांवरील रकमेला कोणतीही मर्यादा नाही.

रेल्वे सेवा : रेल्वे खात्याने 1 डिसेंबरपासून नवीन ट्रेन सुरू करण्याची घोषणा केली आहे. चार दिवसांनी अधिक प्रवाशांना सेवा देण्यात येणार असून, आणखी काही ट्रेन सुरू होणार आहेत. सध्या विशेष ट्रेन सुरू आहेत. यामध्ये पुण्याहून सुटणारी झेलम एक्स्प्रेस (01077/78), मुंबईहून सुटणारी पंजाब मेल (02137/38 ) देखील असणार आहे.