पुरंदर तालुक्याची आमसभा तब्बल दहा वर्षानंतर

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – पुरंदर तालुक्यातील जनतेला ज्या आमसभेची सुमारे दहा वर्षापासून प्रतीक्षा होती, ती प्रतीक्षा आता संपणार आहे. कारण, येणाऱ्या नवीन वर्षात जानेवारी महिन्यातील पहिल्याच आठवड्यात ही बहुप्रतीक्षित आमसभा होणार आहे. नवनिर्वाचित आमदार संजय जगताप यांनी आमसभा आयोजित करण्याचे पंचायत समिती प्रशासनाला आदेश दिले आहेत. सहा जानेवारी रोजी पंचायत समितीच्या छत्रपती संभाजीराजे सभागृहात ही आमसभा पार पडणार आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष आता या बहुप्रतीक्षित आमसभेकडे लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अशोक टेकवडे यांनी त्यांच्या पाच वर्षात तीन वेळा आमसभा घेतल्या होत्या. त्यानंतर माजी आमदार विजय शिवतारे यांनी डिसेंबर २०१० मध्ये एकदा आमसभा घेतली होती. त्या वेळी त्यांना विरोधकांसह तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी यांचा मोठ्याप्रमाणात सामना करावा लागला होता. त्यानंतर विजय शिवतारे यांनी एकदाही आमसभा घेतली नाही. २०१४ मध्ये विजय शिवतारे पुन्हा निवडून आल्यानंतर मंत्री मंडळात राज्यमंत्री म्हणून पाच वर्षे काम पाहिले .

या काळातही त्यांनी एकदाही आमसभा घेण्याचे धारिष्ट्य दाखविले नाही . मागील दहा वर्षाच्या काळात काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय झुरंगे यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमसभा घेण्याबाबत वेळोवेळी मागणी केली होती. परंतु  काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख प्रक्षांचा विरोध पाहता पुन्हा आमसभा घेण्याचे धाडस केले नाही.

या आमसभेत जलसंधारणाच्या कामातील भ्रष्टाचार, चुकीची झालेली कामे, बंधाऱ्यांची अवस्था, शेती पीक नुकसानीची मागणी, तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींचे पाच टक्के अनुदान खर्च करणे, गावागावांतील अंतर्गत घरांचे अतिक्रमण, पाण्याच्या योजना, तालुक्यातील अर्धवट राहिलेली विकासकामे, विमानतळ प्रकल्पाचा विरोध, गुंजवणी धरणाची पाइपलाइन, शेतकरी अनुदान, तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या इतर मागण्या, तालक्यातील वाढती गुन्हेगारी, तालक्यातील बेरोजगारी आदी प्रमुख विषय विद्यमान आमदार संजय जगताप कशा पद्धतीने हाताळणार याकडे सध्या तालुक्याचे लक्ष लागले आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/