IPL-2020 : चेन्नई सुपर किंग्स संघातील पुणेकर खेळाडू ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चेन्नई सुपर किंग्ज संघासमोरील अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. शुक्रवारी (दि.28) संघातील गोलंदाज दीपक चहरसह 10 स्टाफ सदस्यांना कोरोना झाल्याचे वृत्त समोर आलं आहे. या धक्यातून सावरण्यापूर्वी CSK ला आणखी एक धक्का बसला. संघाचा उपकर्णधार आणि प्रमुख खेळाडू सुरेश रैनानं कौटुंबिक कारणास्तव भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे. आणि तो यांदाची आयपीएल खेळणार नाही. त्यानंतर आणखी एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्राचा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड याला कोरोना झाल्याचे समोर येत आहे.

ऋतुराज गायकवाडनं 2016-17 च्या रणजी मोसमात महाराष्ट्र संघाकडून पदार्पण केलं. त्याचवर्षी त्याने आंतरराज्य 20-20 स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलं. ऑक्टोबर 2018 मध्ये त्याला भारत ब संघाकडून देवधर ट्रॉफीत खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर ACC एमर्जिंग टीम आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाचा सदस्य होता. डिसेंबर 2018 मध्ये चेन्नई सुपर किंग्जनं त्याला आपल्या ताफ्यात घेतले. भारत अ विरुद्ध श्रीलंका अ यांच्यातील सामन्यात त्यानं नाबाद 187 धावा केल्या होत्या.

सुरेश रैनाची स्पर्धेतून माघार

चेन्नई सुपर किंग्सनं शनिवारी ट्विटवर पोस्ट करून माहिती दिली. सुरेश रैनानं वैयक्तिक कारणास्तव भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो आयपीएलच्या यंदाच्या मोसमात खेळणार नाही. रैना आणि त्याच्या कुटुंबीयांना चेन्नई सुपर किंग्सचा पूर्ण पाठींबा आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी केएस विश्वनाथ यांनी सांगितले.