BMC निर्णय ! विनामास्क मुंबईकरांना दंड बजावल्यावर ‘मोफत’ मास्कही मिळणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा नियमित वापर अत्यावश्यक आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर आर्थिक दंडाची कारवाई केल्यानंतर सोबत त्यांना एक मास्क विनामूल्य देण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आता घेतला आहे. मास्क मोफत दिल्याची नोंद संबंधित दंडाच्या पावतीवर देखील केली जाणार आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे नागरिकांनी मास्क वापरणे आवश्यक आणि जरुरीचे आहे. महानगरपालिका आयुक्त श्री. इक्बाल सिंह चहल यांनी विना मास्क घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना 200 रुपये दंड ठोठावण्याचे आदेश दिले होते. तसेच महानगरपालिका क्षेत्रातील सर्व 24 विभाग कार्यालयांच्या हद्दीत विना मास्क वावरणाऱ्या नागरिकांवर अधिकाधिक कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार विना मास्क आढळलेल्या 4 लाख 85 हजार 737 नागरिकांवर कारवाई करून महापालिकेने आतापर्यंत सुमारे 10 कोटी 7 लाख 81 हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

मास्क न लावता किंवा अयोग्य रीतीने लावून फिरणाऱ्या नागरिकांना मास्कची आवश्यकता देखील समजावून सांगितली जाणार आहे. मास्क नसल्यास दंड केल्यानंतर संबंधित नागरिक पुन्हा विना मास्क पुढे जातात. त्यामुळे मास्क वापराच्या मूळ उद्दिष्टांची पूर्तता व्हावी, यासाठी दंड करण्यासोबत संबंधित नागरिकास एक मास्क देखील बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मोफत पुरविला जाणार आहे.