‘कोरोना’मुळे विद्यार्थी संख्या रोडावणार ! शहर आणि उपनगरातील मजूर उपासमारीला कंटाळून निघाले गावाकडे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी 24 मार्चपासून लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे परप्रांतीयांसह ग्रामीण भागातील मजूर वर्ग स्थलांतरित होत आहे. ही बाब शिक्षण विभागासाठी ते मारक ठरणार आहे. लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यवसाय आणि कंपन्यांची कामे बंद असल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यातून उपासमारीला कंटाळून गावाकडे जात असल्याने शाळेच्या पटसंख्येवर विपरित परिणाम होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून महापालिकेसह खासगी शिक्षण संस्थांच्या शाळांनी ‘ऑनलाईन’ प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. तरीसुद्धा मजूरवर्ग थांबण्याच्या मनस्थितीत नसल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली.

पुणे, पिंपरी-चिंचवड, हडपसर येथील औद्योगिक वसाहतीसह अन्य भागात बाहेरून आलेले मिळेल त्या वाहनाने आपआपल्या गावी परतू लागले आहेत. दुसरीकडे, करोना संसर्गाची भीती असल्याने अनेकांनी पुन्हा न येण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्वाचा विपरीत परिणाम शिक्षण विभागावर होणार आहे. विद्यार्थी शाळा सोडून जात असल्याने त्या त्या शाळांची पटसंख्या कमी होणार असून, याचा फटका शिक्षक आणि शिक्षकेतर वर्गाला बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच सध्या आधार कार्ड ऑनलाइन अपडेटची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे ३० स्पटेंबपर्यंत शाळांतील विद्यार्थ्यांच्या संख्येत कमालीची घट होण्याची संख्या नाकारता येत नाही.

लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग व्यवसाय ठप्प झाले. या उद्योगांवर शहर, जिल्हा तसेच इतर राज्यातील मजूर, कामगार अवलंबून होते. मागिल दोन महिन्यांपासून औद्योगिक वसाहतीतील यंत्राचा आवाज थांबला, तसा पुणे शहर उपनगर आणि लगतच्या कामगार, मजुरांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. जवळची पुंजी संपत असतांना घरमालकाने भाड्यासाठी तगादा लावला म्हणून मोजक्या सामानासह चिमुकल्यांना घेऊन या मंडळींनी गावचा रस्ता धरला आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून ऑनलाइन अभ्यास वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहणे सुरू आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून विद्यार्थी प्रवेशासाठी प्रयत्न होत असल्याचे खासगी शिक्षण संस्थांकडून सांगण्यात येत आहे.

स्थलांतरित विद्यार्थीही शहराबाहेर जात आहेत. यामुळे त्या त्या भागातील शाळांमधून किती विद्यार्थी कमी झाले, हे चित्र अद्याप अस्पष्ट आहे. स्थलांतराचा फटका बसणार हे निश्चित. नेहमी मे महिन्यात शिक्षकांच्या मदतीने पट नोंदणी अभियान राबविले जाते. यंदा मात्र करोनाचे सावट असल्याने गुगल लिंकच्या माध्यमातून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. अद्याप शासनाकडून कुठल्याही प्रकारची सूचना न आल्याने जूनच्या पहिल्या आठवडय़ात शिक्षकांकडून विद्यार्थ्यांची माहिती जमा करण्यास सुरूवात होईल.

परप्रांतीय आणि जिल्ह्यातील मजूर गावाकडे जात आहे. कोरोनाची भीती संपल्यानंतर पुन्हा मजूरवर्ग शहराकडे येणार आहे. शहर आणि शहरालगतच्या गावामध्ये स्थलांतरित होणारा वर्ग मोठा आहे. शहर आणि उपनगरांमधील मराठी शाळांच्या पटसंख्येवर परिणाम होईल. स्थानिक कंपन्या सुरू होत आहेत, तुम्ही येथेच थांबा असे आवाहन करत आहोत. मात्र, कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे मजूर वर्ग शहरामध्ये थांबण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. मात्र, शाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा शहर उपनगरामध्ये आलेल्या मजुरांच्या मुलांना प्रवेश दिला जाईल. तसेच, त्यांच्या अभ्यासाची तयारीसुद्धा करून घेतली जाईल, असे प्राथमिक विभागाच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले.