मोठी बातमी : लोकसभेच्या मतदानानंतर पेट्रोल-डिझेल पाठोपाठ दुधाच्या किंमतीत वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उन्हाळ्यामध्ये दुग्धजन्य पदार्थ करण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे दुधाला जास्त मागणी असते. दुधापासून बनणाऱ्या आईस्क्रीम, दही, ताक यांना उन्हाळ्यात खासकरून जास्त मागणी असते. त्यातच अमूल डेअरीने दुधाच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला असून दुधाच्या किंमतीत दोन रुपयांनी वाढ केली आहे. ही वाढ मंगळवारी (दि.२१) पासून लागून होणार आहे.

देशातील लोकसभा निवडणुकीच्या अंतीम टप्प्यातील मतदान रविवारी पार पडले. मतदान संपताच दुसऱ्याच दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात ८ ते १० पैशांनी तर डिझेलच्या दरात १५-१६ पैशांनी वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यानंतर दुधाच्या दरातही वाढ करण्यात आल्याने सरकारवर टीका सुरु झाली आहे.

अमूलची मालकी गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनकडे आहे. या महासंघासोबत राज्यातील १८ डेअरी जोडलेल्या आहेत. अमूलचे व्यवस्थापकीय संचालक आर.एस. सोधी म्हणाले, गेल्या काही दिवासंपूर्वी अमूलने दूध उत्पादन शेतकऱ्यांसाठी दूध खरेदी मूल्य १० रुपयांनी वाढवले आहे. त्यामुळे अमूल डेअरीशी जोडलेल्या 1200 दूध असोसिएशनच्या सात लाख पशुपालन करणाऱ्यांना याचा फायदा पोहोचला होता. तसेच गेल्या काही वर्षामध्ये उत्पादनाच्या खर्चात २० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे अमूल दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ करावी लागत आहे.

अमूलचे टोंड मिल्क (ताजा) ४२ रुपये लिटर आहे तर फुल क्रीम मिल्क (गोल्ड) ५२ रुपये लिटर दराने उपलब्ध आहे. मात्र, मंगळवार पासून दोन रुपयांची वाढ केल्याने हेच दूध अनुक्रमे ४४ आणि ५४ रुपये लिटरने मिळणार आहे.