Coronavirus : शिवसेनेच्या गटनेत्या पाठोपाठ त्यांच्या आईचाही ‘कोरोना’मुळे मृत्यू

मीरारोड : पोलीसनामा ऑनलाइन –   मीरा भाईंदर महापालिकेतील शिवसेनेचे गटनते हरिश्चंद्र आमगावकर यांचे मंगळवारी (दि.9) कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला असतानाच आज (बुधवार) त्यांच्या आईचे देखील कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाल्याने आमगावकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

आमगावकर, त्यांची आई, पत्नी व भावाला 27 मे रोजी कोरोनाची लागण झाल्याने ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची पत्नी व भावाने कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र 13 दिवस कोरोनाशी झुंज दिल्यानंतर मंगळवारी 47 वर्षाच्या आमगावकर यांचे निधन झाले. विशेष म्हणजे आज त्यांचा वाढदिवस होता आणि सकाळी त्यांच्या आईचे देखील कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झालं. मुला पाठोपाठ आईचे देखील निधन झाल्याने आमगावकर यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

भाईंदर पूर्वेच्या गोडदेव-न्यू गोल्डन नेस्ट-इंद्रलोक-फाटक भागातून 2012 साली ते निवडून आले होते. याच परिसराच्या प्रभाग 10 मधून आमगावकर हे 2017 साली पुन्हा नगरसेवक झाले. कोरोनाच्या संसर्ग काळात प्रभागातील नागरिकांना त्यांनी अन्न धान्य, भाजीपाला, जेवण उपलब्ध करून देत ते प्रभागात फिरत होते. प्रभागात कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात सापडू लागल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आल्यापासून परिसरात ते अत्यावश्यक वस्तू पुरवण्याच्या कामात त्यांनी पुढाकार घेतला होता.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे त्यांनी आई, पत्नी पुजा, भाऊ आदी कुटुंबियांना रायगड येथील त्यांच्या गावी सोडण्यास गेले होते. परंतु तेथे प्रकृती अस्वस्थ्यामुळे सर्वांना घेऊन ते पुन्हा भाईंदरला आले. 27 मे रोजी त्यांना कोविड रुग्णालयात दाखल केले. सर्वांचे स्वॅबचे नमुने घेतल्यावर त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.