उद्धव ठाकरेंच्या ‘जालियानवाला बाग’च्या टीकेवर शरद पवार म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशात उग्र आंदोलने सुरू आहेत. दिल्लीतील जामिया इस्लामिया विद्यापीठात आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना पोलिसांनी अमानुष मारहाण केली होती. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मारहाणीची तुलना जालियानवाला बाग हत्याकांडाशी केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, पवार यांनी त्या वक्तव्याचा संबंध राज्यातील महाविकास आघाडीच्या योग्य वाटचालीशी जोडला आहे.

उद्धव यांनी केलेल्या टीकेबाबत शरद पवारांना विचारले असता ते म्हणाले, याचा अर्थ गाडी बरोबर दिशेने जात आहे. सरकार पूर्ण पाच वर्षे टिकायला आता काही अडचण दिसत नाही. शरद पवार यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेवर आता चर्चा सुरू असून शिवसेना पक्ष हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष विचारांना साथ देत असल्याचे, शरद पवारांना म्हणायचे होते, असाही निष्कर्ष काढला जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निशाण्यावर सध्या भाजपा असून ते संधी मिळताच भाजपाचे केंद्रीय नेतृत्व आणि राज्यातील नेतृत्वावर टीका करत आहेत. त्यांनी जामिया मारहाणीची जालियानवाला बागशी केलेली तुलना राष्ट्रवादीने उचलून धरली आहे. कालच राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेचा संदर्भ देत अमित शहा हे जालियानवाला बाग घडविलेल्या जनरल डायरपेक्षा कमी नाहीत, असे म्हटले होत.