अहमदनगर : बड्या व्यापाऱ्याविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील प्रसिद्ध व्यापारी असलेल्या राजेंद्र कांतीलाल चोपडा (रा. शेंडी, ता. नगर) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने शेतातील मजुरास मारहाण करून दमदाटी केली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, राजेंद्र चोपडा याची नगर तालुक्यातील शेंडी (पोखर्डी) येथे शेती आहे. शेती राखणीसाठी व अन्य पडेल त्या कामासाठी एका आदिवासी कुटुंबास १० हजार रुपये तोंडी देणे ठरले होते. हे काम गेल्या १० वर्षापासून ते कुटुंब करत आले आहेत. ती १० वर्षाची राहिलेली रक्कम द्यावी म्हणून सदर उद्योगपतीकडे वारंवार महिलांनी मागणी केली. गुरुवारी दि.५ डिसेंबर ला १० वर्षाच्या कामाचे पैसे मागण्यासाठी उद्योगपतीच्या पोखर्डी येथील बंगल्यावर महिला गेली असता, त्यांनी शिवीगाळ केली व तेथे अन्य ३ अनोळखींनी सर्व महिलांना लाथाबुक्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. यात एका अनोळखी माणसाने फायबरच्या दांडक्याने मांडी, हाताला व कमरेला मारहाण करून दुखापत केली. यावेळी जवळ असणाऱ्या बाळाला मार लागला आहे. यानंतर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झालो.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात सुमारे साडेपाच तास ताटकळत रात्री उशिरापर्यंत बसलेल्या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन कलम १८६० नुसार १४३,१४७, ३२४, ३२३, ५०४, ५०६ , अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ नुसार ३(१) (s), ३(१)(r), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ नुसार ३७(१)(३), १३५ अन्वये एमआयडीसी पोलीस ठाण्यात राजेंद्र चोपडा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Visit : Policenama.com