मी काँग्रेसमध्ये राहिले पाहिजे असे नाही : विरोधी पक्षनेते विखे यांचे पुत्र डॉ. सुजय यांचे विधान

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – वडील काँग्रेसमध्ये आहेत म्हणून मी काँग्रेसमध्ये राहीलेच पाहिजे असे नाही, असे विधान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे पुत्र डॉ. सुजय विखे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे गेल्या काही महिन्यांपासून ते भाजपात प्रवेश करणार असलेल्या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे.

ते म्हणालो की, माझे वडील काँग्रेसचे नेते असले, तरी मला माझा पक्ष निवडण्याचा अधिकार आहे. मला स्वतंत्र नेतृत्व मान्य असेल, तर मी त्या नेतृत्वाकडे जाऊ शकतो. त्यास माझ्या कुटुंबाचा विरोध असला, तरीही मी माझा निर्णय घेईल, असेही त्यांनी नमूद केले आहे.

विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सलोख्याचे सबंध असल्याने विखे भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा नेहमीच सुरू असतात. त्यात विखेंचे पुत्र डॉ. सुजय यांना नगर लोकसभेची जागा लढवायची आहे. त्यांनी वेळोवेळी काँग्रेस पक्षाने तिकीट देवो अथवा नाही, मी निवडणूक लढवणारच असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय चर्चांनी अधिक वेग घेतला आहे. विरोधी पक्षनेत्यांचे पुत्रच असे बोलू लागल्याने काँग्रेस नेते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.