काय सांगता ! होय, दिल्लीतून पुण्यात येत होते बनावट चेक, ‘असा’ झाला टोळीचा पर्दाफाश

नगर : पोलीसनामा ऑनलाइन – वेगवेगळ्या बँकांमधून बनावट चेकद्वारे कोट्यावधी रुपये काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा नगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. नगर पोलिसांनी या टोळीच्या मुख्य सुत्रधाराच्या दिल्लीत मुसक्या आवळल्या आहेत. विजेंद्रकुमार उर्फ विजेंन्द्र रघुनंदनसिंग दक्ष (रा. दक्षिण दिल्ली) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. त्याच्या पुण्यातील हस्तकांना नगर पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे.

बनावट धनादेश तयार करुन बँकेतून रक्कम काढणाऱ्या टोळीला गेल्या आठवड्यात नगर पोलिसांनी शिताफिने पकडले होते. आरोपी नगरमधली स्टेट बँकेच्या सावेडी शाखेत अडीच कोटी रुपयांचे बनावट चेक घेऊन आले होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून तिघांना अटक केली. पोलिसांनी विपुल नरेश वक्कानी (वय-40 रा. बी.टी. कवडे रोड, घोरपडी गाव पुणे), यशवंत दत्तात्रय देसाई (वय-49 रा. शाहूनगर, चिंचवड), नरेश रामचंद्र बालकोंडेकर (वय-33 रा. भोसरी) या तिघांना अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या इतर साथिदारांची माहिती दिली. मिळालेल्या माहितीच्या आधारे नगर पोलिसांनी राहुल ज्ञानोबा गुळवे (रा. वाघोली, पुणे) याला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हे चेक त्याचा दिल्लीतील साथीदार विजेंन्द्र दक्ष (रा. कालकाजी, दक्षिण दिल्ली) याने दिल्याची माहिती दिली. चौकशी दरम्यान, गुळवे याने आणखी काही चेक संदीप भगत (रा. पुणे) व तुषार आत्माराम कंभारे (रा. वाघोली) यांच्या मार्फत विविध बँकेत भरल्याचे सांगितले.

पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता सहा मोबाईल, विविध कंपन्या व एजन्सीच्या नावाचे पाच बनावट शिक्के, चेकवर मारतात तो अकाऊंट पे ओनलीचा शिक्का, स्मॉल फायनान्स बँक, आन्ध्र बँक, एडीएफसी बँक, एस बँक, फेडरल बँक, ICICI बँक, अ‍ॅक्सिस बँक, आजरा अर्बन को. बँक, या बँकांचे कोरे चेकबुक तसेच वेगवेगळ्या नावाने रकमा भरलेले काही चेक आढळून आले. पोलिसांनी आरोपी ज्या वाहनातून नगरमध्ये आले होते. ती माहागडी वाहने जप्त केली आहेत. आरोपी संगनमत करुन अशा प्रकारे आयसीआयसीआय बँक, शाखा चिंचवड, पुणे येथेही बनावट चेक वटवण्याचा प्रयत्न केला असल्याचे तपासात समोर आले आहे.

नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या टोळीचा मुख्य सुत्रधार विजेंन्द्र दक्ष या दिल्लीत अटक करुन नगरमध्ये आणले. त्याला न्यायालयात हजर केले असता सात मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याने महाराष्ट्र तसेच इतर राज्यात वेगवेगळे गुन्हे केले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे करीत आहेत.