राधाकृष्ण विखे-पाटील लवकरच महाविकास आघाडीत दिसतील, नगरच्या पालकमंत्र्यांनी सांगितलं

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – अहमदनगरचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील नाइलाजाने भाजपमध्ये गेले आहेत. ते लवकरच महाविकास आघाडीमध्ये दिसतील. त्या दरम्यान शेजारीच भाजपचे खासदार आणि विखेंचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील शेजारीच होते त्यांनी केवळ स्मितहास्य केलं, मात्र त्या विषयावर बोलणं टाळले.

अहमदनगर येथील पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ बोलत होते. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी विखे – पाटील यांच्याबाबत त्यांना प्रश्न केला. त्यावेळी मुश्रीफ यांनी असं विधान केलं. त्यांच्या या विधानामुळे उपस्थित लोकांमध्ये हशा पिकला होता. सध्या राजकीय वर्तुळात विखे हे पुन्हा महाविकास आघाडीमध्ये परततील अशी चर्चा आहे. अशातच त्यांनी पक्षविरहित कामं देखील सुरु केली आहेत. त्यांनी श्रीरामपूरमध्ये त्यांच्या वैयक्तिक नावाने संपर्क कार्यालय सुरु केले आहे त्यात पक्षाचा उल्लेख नसल्याने जोरदार चर्चांना उधाण आलेले आहे.

दरम्यान मुश्रीफ यांना प्रश्न विचारला गेला की, सध्याचे सरकार लवकरच कोसळेल, असे भाजप नेते सांगत आहेत. यावर मुश्रीफ म्हणाले की, जोपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी या तिघांच्या मनात आहे, तोपर्यंत हे सरकार चालणार आहे. अजित पवार यांना उद्देशून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की, यापूर्वीच एकत्र यायला हवे होते. त्यामुळे ही आघाडी १५ वर्ष तरी एकत्र राहू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ते म्हणाले की, भाजपात गेलेले सर्व नेते लवकरच आमच्याकडे येतील. असे देखील त्यांनी स्पष्ट केले.