संतापजनक ! संपूर्ण राज्याला हादरवणारी घटना, बलात्काराची केस मागे घेण्यासाठी पती-पत्नीला विवस्त्र करून बेदम मारहाण

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. बलात्कार प्रकरणातील तक्रार मागे घेण्यासाठी पीडित महिलेसह तिच्या पतीलाही विवस्त्र करून पेट्रोल टाकून बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेत पोलिसाचाही समावेश असल्याचा आरोप पीडित पती-पत्नीने केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे.

तक्रार दिली तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धकमी दिली. तसेच नवऱ्याचे विर्य काढून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी आरोपींनी दिली असल्याचा दावा पीडित कुटुंबाने केला आहे. अहमदनगरमध्ये 2016 मध्ये एका विवाहित महिलेवर सामूहीक बलात्कार करण्यात आला होता. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल झाला होता.

आरोपीमध्ये वडील आणि भावासह पोलीसही सहभागी आहे. तक्रार मागे घेण्यासाठी पीडित कुटुंबावर दबाव टाकण्यात येत आहे. मेडिकल रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याने हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानेही आरोपींना जामीन नाकारला. चार वर्षे झाली तरी या प्रकरणाची चार्जशीट दाखल झालेली नाही. पीडित पती-पत्नीला फिर्याद मागे घेण्यासाठी यापूर्वीही महिलेला मारण्याचा प्रयत्न झाला होता.

24 जानेवारी रोजी पीडित पती-पत्नी शासकीय रुग्णालयातून उपचार घेऊन घरी जाण्यासाठी रिक्षात बसले. त्यावेळी रिक्षामध्ये अधिच एक व्यक्ती बसलेली होती. या व्यक्तीने दोघांना गुंगीचे औषध देऊन त्यांना अज्ञात स्थळी नेण्यात आले. त्याठिकाणी एका बंदिस्त खोलीमध्ये पती-पत्नीचे कपडे काढून त्यांना विवस्त्र करण्यात आले. त्याच कपड्यांनी दोघांना टांगण्यात आले. तसेच त्यांना पट्टयाने मारहाण करत अंगावर पेट्रोल टाकण्यात आले. या मारहाणीचा व्हिडिओ बनवून पती-पत्नीला बलात्काराची तक्रार मागे घेण्यास सांगितले. तक्रार मागे घेतली नाही तर जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.

आरोपींनी मारहाण केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच तू या ठिकाणी आला होता आणि तू दुसऱ्या महिलेवर अत्याचार केले अशी तक्रार आम्ही करु अशी धमकी दिली. घाबरलेल्या पती-पत्नीने तुमच्या विरोधात केस चालणार नाही असे सांगितल्यावर त्यांना नगर येथे सोडून दिले. मारहाण करताना आम्ही पोलीस आहोत असेही दोघांनी सांगितले असल्याचे पीडितेने म्हटले आहे. या प्रकरणात पोलिसाचा हात असल्याने पीडित कुटुंबाला न्याय मिळणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे.