वर्ल्डकप टीममधून डावललेल्या अजिंक्य रहाणेला आता ‘या’ संघाकडून खेळायचंय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – वर्ल्डकप स्पर्धेसाठी नुकतीच भारताच्या १५ सदस्यीय टीमची घोषणा करण्यात आली. मात्र कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेची विश्वचषकाच्या टीममध्ये निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या रहाणेला कौंटी क्रिकेटमध्ये हॅम्पशायर संघाकडून खेळायचं आहे. त्यासाठी त्याने बीसीसीआयला पत्र पाठवले आहे.

कौंटी क्रिकेटमध्ये सामन्यात रहाणेला सहभागी व्हायचे आहे. त्यासाठी त्याने मे, जून आणि जुलैच्या मध्यंतरात कौंटी क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी मिळावी म्हणून रहाणेने बीसीसीआयला पत्र पाठवले आहे. शिवाय त्याने एक प्रत सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीलाही पाठवली आहे.

याविषयी बीसीसीआयचे अधिकारी राहुल जोहरी म्हणाले की,  रहाणे हा वर्ल्ड कप संघाचा सदस्य नाही. त्यामुळे त्याला परवानगी नाकारण्याचे काही कारण नाही . याआधी बीसीसीआयने विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाला यांना कौंटी क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी दिली होती. रहाणेला कौंटीत चार दिवसीय सामने खेळायचे आहेत. त्याचा भविष्यातील कसोटी मालिकांत त्याला फायदाच होईल.’

३० वर्षीय रहाणेने कसोटी क्रिकेटमध्ये आपला दबदबा दाखवून दिला आहे, परंतु मर्यादित षटकांच्या सामन्यांत त्याला पुरेशी संधी मिळालेली नाही. आतापर्यंत तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजिंक्य रहाणेची विश्वचषकाच्या टीममध्ये निवड करण्यात आलेली नाही. गेल्या काही महिन्यांमध्ये अजिंक्यला मर्यादित षटकांच्या सामन्यांपासून दूर ठेवण्यात आले होते. पण इंग्लंडचे वातावरण आणि खेळपट्ट्या पाहता अजिंक्यला विश्वचषकाच्या संघात संधी मिळेल, असे काही जणांना वाटत होते. पण रहाणेला विश्वचषकाच्या टीममध्ये स्थान देण्यात आलेले नाही.