भाजप आमदाराला विधान भवनाच्या गेटवर आडवलं, अजितदादांनी अधिकाऱ्यांना गेटवरच झापलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून लॉकडाऊन करण्यात आल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. याचा फटका मंत्रालयीन कामकाजाला देखील बसला होता. अखेर विधिमंडळाचे कामकाज आज सुरु झाले आहे. पण पहिल्याच दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना गेटवरच झापले.

विधिमंडळाचे कामकाज आजपासून सुरु झाले आहे. राज्यातील सर्व आमदार विधान भवनात हजर होत आहे. दरम्यान, या सर्व आमदारांची आणि मंत्रालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची कोविड टेस्ट करण्यात आली आहे. ज्यांचा कोविड रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे त्यांनाच आतमध्ये सोडण्यात येत आहे. विधिमंडळाच्या गेटवर येणाऱ्या प्रत्येकाला स्वॅब टेस्टचा रिपोर्ट दिला जात आहे. मात्र स्वॅब घेऊनही काही आमदारांना रिपोर्ट न मिळाल्याने त्यांना आत सोडण्यात आले नाही. त्यामुळे गेटवर एकच गोंधळ उडाला होता.

टेस्ट करून 24 तास झाले मात्र रिपोर्ट अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे आम्हाला अधिवेशनात जाता येत नाही, या सरकारने काही एजंट ठेवले आहेत का, रिपोर्ट मिळेल का, असा सवाल करत माजी अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हरिभाऊ बागडे यांच्यासोबत सेनेच्या काही आमदारानीही आपली अडचण बोलून दाखवली आहे. याच वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्या ठिकाणी दाखल झाले.

हरिभाऊ बागडे यांनी या प्रकाराबाबत अजित पवार यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर विधिमंडळाच्या गेटवरच अजित पवारांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले. असे कसे काम करता, असे चालणार नाही, आमदारांचे रिपोर्ट दिले नाही तर ते आतमधे कसे जातील ? ताबडतोब सर्व आमदारांचे चाचणी रिपोर्ट द्या आणि सर्वांना आतमध्ये सोडा, असे आदेश देताच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. सर्व आमदारांचे रिपोर्ट तातडीने देण्यात आल्यानंतर सर्व आमदार विधिमंडळात पोहोचले.