वरिष्ठांचा आदेश येताच अजित पवारांनी Delete केलं ‘ते’ Tweet !

भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची आज जयंती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंडित दीनदयाळ यांना अभिवादन करणारं ट्विट केलं होतं. परंतु वरिष्ठांकडून सूचना येताच तासाभरातच त्यांनी ते ट्विट डिलीट केलं. या घटनाक्रमामुळं आता वेगळ्याच चर्चेला उधाण आलं आहे.

दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनता पक्षाचा मूळ अवतार असलेल्या जनसंघाचे सहसंस्थापक आहेत. आज त्यांची जयंती आहे. आज भाजपच्या सर्व नेत्यांनी त्यांना सोशल मीडियावरून आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनीही दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. परंतु चर्चा झाली ती म्हणजे अजित पवारांनी आधी पोस्ट आणि नंतर डिलीट केलेल्या ट्विटची.

काय होतं अजित पवारांचं ट्विट ?

अजित पवारांनी ट्विट केलं होतं की, “भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक, ज्येष्ठ नेते स्वर्गीय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.” अजित पवारांनी हे ट्विट सकाळी 8 वाजून 48 मिनिटांनी केलं होतं.

राष्ट्रवादीच्या इतर कोणत्याही नेत्यानं असं ट्विट केलं नव्हतं. त्यामुळं अजित पवारांचं ट्विट पाहून साऱ्यांच्या भुवया उंचावल्या. अजित पवार भाजपला मेसेज देऊ पाहत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यांच्या ट्विटरवर तशा प्रतिक्रिया देखील येऊ लागल्या होत्या. हे सगळं सुरू असतानाच तासाभरात अजित पवारांच्या ट्विटरवरून ते ट्विट गायब झालं. त्यामुळं पुन्हा चर्चा सुरू झाली.

अजित पवारांनी वृत्तवाहिन्यांसोबत बोलताना याबाबत खुलासा केला. अजित पवार म्हणाले, “हयात नसलेल्या व्यक्तींबद्दल चांगलं बोलणं ही आपली संस्कृती आणि परंपरा आहे. त्यानुसार मी हे ट्विट केलं होतं. परंतु समाजकारण, राजकारण करत असताना वरिष्ठांचं ऐकावं लागतं. इतरही गोष्टीही असतात” असंही ते म्हणाले.