Ajit Pawar | आरक्षणाच्या वादात भडक वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना अजित पवारांचा सज्जड इशारा, ‘कितीही किंमत मोजावी…’

कर्जत : Ajit Pawar | आज महाराष्ट्रात कोणी राजकारणासाठी जाती-जातीत भांडण लावून दंगली घडवून आणत असतील तर मी सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष आणि हा अजित पवार (Ajit Pawar) हे होऊ देणार नाही. त्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी हे होऊ देणार नाही, असा सज्जड इशारा आरक्षणाच्या वादात भडक वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना दिला आहे.

सध्या राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे मनोज जरांगे (Manoj Jarange) आणि मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) थेट विरोध करताना भडक वक्तव्य करत आहेत, त्यांना उत्तर देताना मनोज जरांगे देखील जशासतसे बोलत असल्याने अजित पवार यांनी नाव न घेता हा इशारा दिल्याचे बोलले जात आहे.

कर्जत येथे आयोजित पक्षाच्या शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. पदाधिकारी आणि नेत्यांना संबोधित करताना अजित पवार म्हणाले, म. गांधींची हत्या झाली तेव्हा महाराष्ट्रात जातीय दंगली झाल्या. तेव्हा मराठा नेतृत्त्वाने हे लोण वाढू दिले नाही. आज महाराष्ट्रात समाजा-समाजात तेढ निर्माण होईल, अशी चिथावणीखोर भाषणे होत आहेत. दुसऱ्या समाजाला उसकवले जात आहे, हे थांबले पाहिजे. यातून दंगली घडल्या तर कोण जबाबदार? दंगलीमध्ये गरिबाचे घर जळते, रक्त सांडते ते गरिबांचे सांडते.

अजित पवार म्हणाले, आपली पोरं शिकली पाहिजेत, आयुष्याच्या लढाईत पुढे गेली पाहिजेत असे प्रत्येक आई-बाबाला वाटते. पण दुसऱ्याचे पोर शिकत आहे याचा द्वेष आपण कधीपासून करायला लागलो? हा महाराष्ट्राचा विचार नाही. पवार, जाधव, गायकवाड अशी कित्येक आडनावे महाराष्ट्रातील प्रत्येक जातीत सापडतील. मराठा ही भावकी होती. शेती करणारा कुणबी होता.

अजित पवार म्हणाले, आधीच्या काळात महापुरुषांमध्येही मतभेद होते. लोकमान्य टिळक आणि महात्मा फुले यांच्यातही मतभेद होते. परंतु, टिळकांना न्यायालयात मदत करणारे महात्मा ज्योतिबा फुले याच मातीतले होते, हे विसरून चालणार नाही. यांच्याकडून आपण काही शिकणार आहोत की नाही?

अजित पवार (Ajit Pawar) पुढे म्हणाले, प्रत्येकाला आपल्या जातीचाभिमान असतो. तो असलाच पाहिजे.
परंतु, पहिल्यांदा देश आणि राज्य असायला पाहिजे. शाळा-महाविद्यालयाचा आपल्याला अभिमान असतो.
त्यामुळे जातीचा-धर्माचाही अभिमान असायला हवा. जाती-धर्माचा अभिमान जपत असताना सर्वांना विनंती आहे की,
इतर समाजाबद्दल, जाती-धर्माबद्दल द्वेष किंवा आकस मनामध्ये ठेवू नका. याची सर्वांनी काळजी घ्यावी.

अजित पवार म्हणाले, बोलण्यातून, वर्तवणुकीतून अनवधानानेही असे प्रकार घडू देऊ नका.
एखाद्याच्या समाजाचा मागासलेपणात काळानुरूप बदल झाला असल्यास त्याचे मागासलेपण पुन्हा तपासणे
आवश्यक असते. मागासलेपण सिद्ध करण्यासाठी वेळ लागतो. मराठा समाजातील तरुणांनी हे धान्यात ठेवले पाहिजे. इम्पेरिकल डेटा आणि मागासलेपण सिद्ध होणे फार आवश्यक आहे.
इम्पिरिकल डेटा शास्त्रोक्त पद्धतीने गोळा केल्याशिवाय तो टिकत नाही. त्यामुळे जातनिहाय जनगणना झाली पाहिजे.
जोपर्यंत प्रत्येक समाजाची नेमकी आकडेवारी येत नाही, तोपर्यंत कोणत्या समाजाला किती आरक्षण द्यावे हे नेमके
समजत नाही. महाराष्ट्रात जाती जातीत भांडण उभे राहण्याचे चित्र दुर्दैवी आहे.

मनातील खंत व्यक्त करताना अजित पवार म्हणाले, आज अठरापगड जातीत भांडणे होतात की काय अशी परिस्थिती
निर्माण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुलेंचा आणि शाहू महाराजांच्या
स्वप्नातला महाराष्ट्र हाच आहे का असा प्रश्न पडतो.

अजित पवार म्हणाले, रविंद्रनाथ टागोर यांनी देशाचे राष्ट्रगीत लिहिताना लिहिले की, पंजाब, सिंध, गुजरात, मराठा.
पंजाब होते, सिंधही तेव्हाच होते. गुजरातही राज्य आहे आता. पण राष्ट्रगीतात महाराष्ट्र असे म्हटलेले नाही.
हा देश पूर्वीपासून महाराष्ट्राला मराठा म्हणून ओळखतो. मराठा ही महाराष्ट्राच्या अस्तित्वाची निगडीत अशी ओळख आहे.
अटकेपार मराठ्यांनी झेंडे रोवले असे म्हटले जायचे, तेव्हा सर्व जाती मराठ्यांमध्ये समाविष्ट असायच्या.

अजित पवार म्हणाले, सेनापती बापट उगाच म्हणाले नाहीत की, महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले.
मराठ्याविना राष्ट्रगाडा न चले. अवघ्या देशात पहिले आरक्षण देणारे छत्रपती शाहू महाराज हे आपल्याच कोल्हापुरचे.
परंतु, आरक्षणाच्यानिमित्ताने त्यांचे फोटोही लावले जात नाहीत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar On Sharad Pawar | अजित पवारांनी सांगितला पक्षफुटीचा पडद्यामागील घटनाक्रम, शरद पवारांवर केला ‘हा’ आरोप

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी चिंचवड शहरात बनावट ‘पॅराशूट’ तेलाची विक्री, व्यवसायिकावर गुन्हा

Ajit Pawar On Baramati Lok Sabha | बारामती लोकसभा लढवण्याची अजित पवारांची घोषणा, आव्हानानंतर सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया

Pune Crime News | कमी रकमेच्या वीजबिलासाठी परस्पर वीजमीटर बदलले, दोन तोतया कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल