Lockdown मध्ये देशी दारू दुकाने उघडली, मग मंदिरं का नाही ?, वारकर्‍यांची सरकारवर सडकून टीका

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन –  कोरोना विषाणूचे संक्रमण वाढू नये, म्हणून सरकारने राज्यासह देशातही लॉकडाऊन लागू केला. अन् महसूल वाढीसाठी राज्यासह देशातही दारूची दुकाने उघडण्यास जाहीरपणे परवानगी दिली. यावरून आता सरकारला धारेवर धरले जात आहे. केवळ दारू दुकाने उघडण्यासाठी परवानगी कशी दिली जाते? आणि इतर सुरू करण्यावर हे सरकार बंधने का लादत आहे? असा सावल करत राज्य सरकारवर सडकून टीका केली जात आहे. ’देशी दारूची दुकाने आज उघडी आहेत. पण, मंदिरे बंद आहेत, हे सरकार हिरण्य कश्यपचं सरकार आहे,’ असं म्हणत वारकरी संप्रदायाचे गणेश महाराज शेटे यांनी राज्याच्या ठाकरे सरकारवर जोरदार सडकून टीका केलीय. येत्या 31 ऑगस्टला सरकारला जागं करण्यासाठी पंढरपुरला एक लाखाच्या जवळपास वारकरी ठिय्या आंदोलन करणार आहे, असा इशाराही त्यांनी यावेळी सकरारला दिला आहे.

ते अकोल्यातील पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.या पत्रकार परिषेदेला वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हेही उपस्थित होते. वारकर्‍यांमध्ये आता महात्मा गांधी जिवंत झाले आहेत. ते 31 तारखेला आंदोलन करतील, असे विधान अ‍ॅड प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषदेमध्ये केलं आहे. ’मी मुख्यमंत्री असतो तर कोरोना संपला असं जाहीर केलं असतं,’ असही अ‍ॅड प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी म्हटलं आहे. ’सरकारने अनलॉक प्रक्रिया केली नाही, तर लोकच अनलॉक करत आहेत. सरकारने लॉकडाऊन केलं, परंतु अनलॉक करण्याची चावी त्यांना सापडत नाही,’ अशी टीकाही अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

एसटीमध्ये ई-पास लागणार नाही, परंतु खासगी वाहनाला ई-पास लागतो, हा शासनाचा दुजाभाव आहे, असा आरोप देखील अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. सरकारने ई-पास सक्ती रद्द करावी, अशी मागणीही अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने जिल्ह्याबाहेरील एसटी प्रवासाला परवानगी दिलीय. मात्र, खासगी वाहनांना ई-पासची सक्ती कायम ठेवलीय. आता राज्य सरकारने लॉकडाऊन मागे नाही घेतले तर राज्यात आंदोलन होऊन जनताच लॉकडाऊन पाळणार नाही, हे लॉकडाऊन झुकारून देईल, असे समजत आहे.