सर्व अधिकार एकाच्या हाती, मग राज्यातील सरकारांचा अर्थ काय ?, CM उद्धव ठाकरेंचा नाव न घेता PM मोदींवर निशाणा (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   आज झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत विविध राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी झाले होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत जेईई, नीट आणि जीएसटी या मुद्द्यांवरून मुख्यमंत्र्यांनी उहापोह केला. जेईई आणि नीट यावरही चर्चा झाली. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालू नये असं आवाहन सर्वच मुख्यमंत्र्यांनी केलं. दुसरीकडे जीएसटी आणि केंद्राकडून मिळत नसलेल्या मदतीबाबत उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे आपलं मत मांडलं.

ट्विटरवरून उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, आज सर्व अधिकार एकाच्या हाती एकटवले जात आहेत. अशावेळी राज्यातील सरकारांचा अर्थ काय ? राज्यांनी केवळ होकारार्थी मान डोलवायची ? असं होणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे फेडरल स्ट्रक्चर लक्षात घेऊन आपली राज्यघटना तयार केली आहे त्यात सर्वांना अधिकार दिले आहेत. जर आपण त्याचा आदर करणार नाही तर मग आपल्याकडे लोकशाही कुठे आहे ?

जेईई आणि नीटच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “परीक्षा घ्यायला हव्यात परंतु परिस्थिती सुधारल्यानंतर. शाळा सुरू झाल्यानंतर अमेरिकेत 97000 मुलांना कोरोनाची लागण झाली होती. जर आपल्या बाबत अशी काही परिस्थिती ओढवली तर काय करणार ?” असा सवालही त्यांनी केला.