जाणून घ्या… गांधी घराण्याचा बालेकिल्ला असणाऱ्या ‘अमेठी’ मतदार संघातील ‘या’ रोचक गोष्टी

अमेठी : वृत्तसंस्था – अमेठी मतदारसंघ हा गांधी घराणे व काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यंदा चौथ्यांदा अमेठीमधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. याआधी गांधी घराण्यातून संजय गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे.

अमेठी लोकसभा मतदारसंघाचा इतिहास –

अमेठी लोकसभा मतदारसंघात तिलोई, सलोन, जगदीशपूर, गौरीगंज आणि अमेठी असे विधान सभेचे पाच मतदारसंघ येतात.१९६७ मध्ये अमेठी लोकसभा मतदारसंघात पहिली निवडणूक झाली. १९६७ व १९७१ मध्ये काँग्रेसच्या विद्याधर वाजपेयी यांनी विजय मिळवला होता.

संजय गांधी यांचा पहिल्याच निवडणुकीत पराभव –

१९७७ मध्ये मध्ये जनता पक्षाच्या लाटेत येथून रविंद्र प्रताप सिंह यांनी इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांना हरवून निवडणूक जिंकली होती. विशेष म्हणजे संजय गांधी यांची ही पहिली निवडणूक होती. पण आणीबाणीमुळे इंदिरा गांधी यांच्या सरकारबद्दल लोकांच्या मनात प्रचंड नाराजी होती. १९८० मध्ये संजय गांधी यांचा विजय होऊन पुन्हा अमेठी काँग्रेसच्या ताब्यात आली.

संजय गांधी यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राजीव गांधी यांनी एकहाती निवडणूक जिंकली होती. राजीव गांधी यांच्या विरुद्ध लोकदलने शरद यादव यांना उमेदवारी दिली होती. पण यादव यांचा दारुण पराभव झाला.

राजीव गांधी यांच्या विरुद्ध मनेका गांधी सामना –

१९८४ ला अमेठीच्या निवडणुकीची चर्चा देशभरात झाली कारण गांधी कुटुंबातील दोन व्यक्ती एकमेकांविरुद्ध लढल्या होत्या. राजीव गांधी यांच्या विरुद्ध मनेका गांधी यांनी निवडणूक लढवली होती. या लढतीत मनेका गांधी यांचा मोठया फरकाने पराभव झाला होता. या लढतीत मनेका गांधी यांची अनामत रक्कम जप्त झाली होती. राजीव गांधी यांना ३ लाख ६५ हजार ०४१ मते मिळाली हे प्रमाण एकूण मतांच्या ८३. ६७ टक्के इतके होते. मनेका गांधी यांना केवळ ५० हजार १६३ मते मिळाली होती.

१९८९ ,१९९१ च्या निवडणुकीत राजीव गांधी यांचेच या मतदार संघावर वर्चस्व राहिले. त्यांच्या हत्येनंतर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या कॅप्टन सतीश शर्मा यांनी विजय मिळवला होता. १९९६ ला पुन्हा कॅप्टन सतीश शर्मा याच मतदार संघातून निवडून आले होते. मात्र १९९८ ला काँग्रेसच्या या बाल्लेकिल्ल्याला हादरा बसला. भाजपच्या संजय सिंह यांनी काँग्रेसचा पराभव करत ऐतिहासिक असा विजय मिळवला होता. अमेठी मतदारसंघाची स्थापना झाल्यापासून येथे काँग्रेसचा दुसऱ्यांदा पराभव झाला होता. त्यांनतर १९९९ च्या निवडणुकीत सोनिया गांधी यांनी अमेठीतून विजय मिळवला. त्यानंतर सलग २००४ पासून राहुल गांधी या मतदार संघाचे नेतृत्व करत आहेत.

राहुल गांधी यांना स्मृती इराणी यांचे आव्हान –

अमेठीमध्ये यंदा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी विरुद्ध भाजपच्या स्मृती इराणी यांच्यात सामना रंगणार आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी आणि स्मृती इराणी यांच्यात अटीतटीची लढत झाली होती. त्यावेळी राहुल गांधी यांचा केवळ एक लाख मतांनी विजय झाला होता.

१९७७ व १९९८ चा अपवाद वगळता या मतदारसंघावर काँग्रेस व गांधी घराण्याचे निर्विवाद वर्चस्व राहिलेले आहे.