संतापजनक ! आजारातून बरं करण्यासाठी 3 वर्षांच्या चिमुकल्याला पोटावर दिले गरम सळीचे चटके

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – 3 वर्षांच्या एका चिमुकल्याला आजारातून बरं करण्यासाठी पोटावर गरम चटके दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. अंधश्रद्धेतून हा प्रकार घडला असल्याची माहिती समोर येत आहे. हा चिमुकला पोटावर गरम चटके दिल्यानं गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील लवादा येथील ही घटना आहे.

गावातील 3 वर्षांच्या चिमुकल्याचं पोट 2 दिवसांपासून फुगलं होतं. याला उपचारासाठी रुग्णालयात नेणं गरजेचं होतं पंरतु त्याच्या पोटावर चटके देण्यात आले. सध्या हा चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. त्यावर सध्या सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सध्या मुलाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे अशी माहिती रुग्णालयानं दिली आहे. मेळघाटातील चिमुकल्यांना वारंवार पोटफुगी या आजाराचा सामना करावा लागत आहे. अशात डॉक्टरांकडे जाण्याऐवजी अनेक ठिकाणी आदिवासी पाड्यावर उपचार म्हणून गरम सळीचे चटके मुलांच्या पोटावर दिले जात आहेत. आधीही अशा घटना समोर आल्या आहेत.

यापूर्वी चिखलदरा तालुक्यातील बोरगाव इथं जाणू सज्जन तोटा या बालकालाही सळीनं चटके दिल्याचा प्रकार 18 जून रोजी समोर आला होता. या प्रकरणी चिखलदरा पोलिसांनी चटके देणारा आणि वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला होता. यानंतर देखील चटके देण्याचे प्रकार मेळघाटातून वारंवार समोर येत आहेत. आता शासनानं कडक पाऊल उचलणं गरजेचं आहे.