खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी; शिवसेनेशी ‘कनेक्शन’ ?

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – अमरावतीच्या लोकसभा खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नवनीत राणा यांनी लोकसभेत शिवसेनेविरोधात भाष्य केले होते. त्यानंतर आता त्यांना धमकी देण्यात आली आहे. यातील विशेष बाब म्हणजे ही धमकी सत्ताधारी शिवसेनेच्या लेटरहेडवर लिहून देण्यात आली असल्याचे नवनीत राणा यांचे म्हणणे आहे.

नवनीत राणा यांना धमकी दिल्याप्रकरणी नॉर्थ ऍव्हेन्यू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या एफआयआरची कॉपी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये 13 फेब्रुवारी, 2021 चा दिनांक दिसत असून, धमकीचा संदेश आहे. या प्रकरणावर बोलताना खासदार राणा म्हणाल्या, की 8 फेब्रुवारीला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर मी केलेल्या भाषणाविरोधात शिवसेनेकडून लेटरहेडवरून अज्ञात पत्राच्या माध्यमातून शिव्या आणि अपशब्दाचा प्रयोग करण्यात आला. तसेच 8 दिवसात माफी मागितली नाही तर मला आणि माझ्या पतीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

एफआयआरमध्ये खासदार राणा यांनी सांगितले…
दाखल केलेल्या एफआयआरमध्ये खासदार राणा यांनी सांगितले, की ‘आम्हाला संशय आहे की शिवसेनेच्या नेत्यांनी हे पत्र पाठविले. असे शब्द लोकशाहीसाठी चांगले नाहीत. सध्या मला धमकीचे फोनही केले जात आहेत.’