‘भांडणे’ विसरुन ‘कठोर’ निर्णय घेणं गरजेचं, अमृता फडणवीसांचे CM ठाकरेंना ‘आवाहन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर निशाणा साधला होता. त्यामुळे त्यांच्यात वाद निर्माण झाले होते. वर्धा येथील हिंगणघाट आणि औरंगाबाद मधील घटनेनंतर अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्यातील भांडणं विसरून कठोर निर्णय घेणे आवश्यक असल्याचं आवाहन त्यांनी केले आहे.

वर्धा आणि हिंगणघाट आणि औरंगाबादमधील घटनेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. या घटना दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर निर्णय घेणं गरजेचं असल्याचे मत व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यावर कठोर निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे.

अमृता फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यात चार अॅसिड हल्ल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. हिंगणघाट येथे पेट्रोल टाकून प्राध्यापिकेला जाळण्याचा प्रयत्न, औरंगाबादमधील बलात्काराचे प्रकरण एकून त्रास होतो ! आपल्यातील भांडणे विसरून सुरक्षिततेविषयी कठोर निर्णय घेणे आवश्यक, असे ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी म्हटले असून त्यांनी उद्धव ठाकरे यांना टॅग केलं आहे.

हिंगणघाट येथील घटना ताजी असतानाच औरंगाबादमध्ये अशीच घटना घडली होती. या घटनेत महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये ही महिला 95 टक्के भाजली होती. महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे. ही घटना औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड जळीतकांड घडले होते.