एकेरी उल्लेख करत अमृता फडणवीस यांचे भाई जगताप यांना उत्तर, म्हणाल्या…

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन – तत्कालीन आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी मागितल्याचा आरोप केला आहे. त्यावरून राजकीय वातारण चांगलेच तापले आहे. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षांकडून लावून धरली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते भाई जगताप यांनी देवेंद्र फडणवीस यांनी आधी पोलिसांची खाती बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली होती याचे उत्तर द्यावे, असा सवाल उपस्थित केला होता. त्याला आता अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. विशेष म्हणजे ट्विटरच्या माध्यमातून पलटवार करताना त्यांनी भाई जगताप यांचा एकेरी उल्लेख केला आहे.

Amruta twitt
Amruta twitt

अमृता फडणवीस यांनी या ट्विटमध्ये असे म्हंटले आहे की, ए भाई , तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय ! पोलिसांची खाती तुमच्याच राज्यत तुम्ही ‘UTI बैंक / Axis बैंक ‘ ला योग्यता पाहून दिली होती! लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवसायचे न्हाय! असे म्हटले आहे.

काय आहे प्रकरण आणि काय म्हणाले होते फडणवीस?
राज्यात भाजपची सत्ता असताना मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते होते. त्यावेळी त्यांनी पोलीस खात्याची बहुतांश वेतन खाती स्टेट बँक ऑफ इंडिया’तून अ‍ॅक्सिस बँकेत हस्तांतरित करण्यात आली होती. अ‍ॅक्सिस बँकेत उच्च पदावर अमृता फडणवीस काम करत होत्या याचा संबंध देवेंद्र फडणवीसांशी जोडला गेला होता. विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्वतः स्पष्टीकरण दिले होते. मागील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने अ‍ॅक्सिस बँक किंवा सरकारी खात्यांशी संबंधित कोणत्याही बँकांची निवड केली होती. माझी पत्नी त्या बँकेत नोकरी करते, म्हणून माझ्या सरकारची बदनामी करू शकता, असे कुणाला वाटत असेल तर ते होणार नाही. कारण सरकारी कार्यालयात कधीही माझी पत्नी आली नाही अथवा कुण्या सरकारी अधिकाऱ्याला गेल्या पाच वर्षांत भेटलेलीही नाही, असे फडणवीस यांनी म्हटले होते.