Video : रिक्षावाल्याची करामत पाहून आनंद महिंद्रा खुश, म्हणाले – ‘याला आपल्या टीममध्ये घ्यायला हवं’

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशभरात गंभीर वातावरण असून लॉकडाउनच्या काळात पश्चिम बंगालमधल्या एका रिक्षावाल्याने सोशल डिस्टन्सिंगचे भान राखण्यासाठी एक भन्नाट युक्ती शोधून काढली आहे. सोशल मीडियावर या रिक्षावाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, आनंद महिंद्रा भलतेच खुश झाले आहेत. त्यांनी रिक्षावाल्याला आपल्या टीममध्ये घ्यायला हवे असे ट्वीट केले आहे.

रिक्षावाल्याने सोशल डिस्टन्सिंगचे महत्व पटवून देण्यासाठी प्रवाशांना बसण्यासाठी रिक्षात जागेचे चार भाग केले आहेत. यासाठी रिक्षावाल्याने वापरलेली युक्ती पाहिल्यानंतर महिंद्रा यांनी व्यवस्थापकीय संचालक राजेश जेजुरीकर यांना ट्विटमध्ये टॅग करत, या रिक्षावाल्याला आपल्या टीममध्ये घ्यायला हवे असे म्हटले आहे. कोरोनाविरुद्ध लढ्यातही महिंद्रा उद्योग सुमहाने सक्रीय सहभाग नोंदवला आहे. पंतप्रधान मदतनिधीला आर्थिक दान करण्यापासून ते शेतकर्‍यांना दिलासा देणार्‍या अनेक गोष्टी महिंद्रा यांनी केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी महिंद्रा यांनी केळी उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी आपल्या एका फॅक्टरीतील कँटीनमध्ये प्लेट ऐवजी केळीच्या पानावर जेवण वाढण्यास सुरुवात केली आहे. या कल्पनेसाठीही त्यांचे सोशल मीडियावर कौतुक झाले होते. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. विविध विषयांवर आपल्या खुमासदार शैलीत आनंद महिंद्रा ट्विटरवर व्यक्त होत असतात.