धनगर समाजाच्या हितासाठी 1 हजार कोटींची तरतूद करण्यात आलेल्या ‘त्या’ समितीत आनंद थोरातांची नियुक्ती होणार

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन ( अब्बास शेख ) – दौंड तालुक्यातील धनगर समाजाचे दिग्गज नेते आनंद थोरात यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या पदांवर घेण्याबाबत आश्वासन दिले आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले आनंद थोरात यांनी दिली. दौंडचे आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आनंद थोरात, महेश भागवत यांची भेट घडवून आणली होती त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राहुल कुल यांच्या विनंतीस मान देऊन याबाबत आश्वस्त केले आहे.

याबाबत आमदार राहुल कुल यांनी सविस्तर माहिती देताना राज्य सरकारकडून धनगर समाजाच्या प्रगतीसाठी करण्यात आलेल्या एक हजार कोटीच्या तरतुद योजनेच्या नियंत्रण कमिटीमध्ये धनगर समाजाचे नेते आनंद थोरात यांना घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असून ही कमिटी धनगर समाजासाठी देण्यात येणारे एक हजार कोटी रुपये हे धनगर समाजात खर्च होतायत का ? ते कुठे व कसे खर्च होतायत, यातून कुणी लाभार्थी सुटत तर नाही ना अश्या विशेष बाबींवर लक्ष ठेऊन काम करणार असल्याचे सांगितले.

त्या सोबतच माळी समाजाचे नेते महेश भागवत यांनाही पाण्याबाबत चांगला अभ्यास असून त्यांनाही भविष्यामध्ये शहर आणि ग्रामीण भागातील पाणी नियोजनामध्ये घेण्याचा मानस असल्याचे सांगितले. याबाबत आनंद थोरात आणि महेश भागवत यांनी बोलताना ज्यावेळी आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळी पहिल्याच भेटीत मुख्यमंत्र्यांनी आम्हाला समाजाच्या हितासाठी १ हजार कोटी रुपायांची तरतूद करण्यात आलेल्या कमिटीत घेण्याचे आश्वासन देणे हे खूपच सुखद असून महेश भागवत यांनाही चांगले मानाचे स्थान देण्याचे आश्वासन मिळणे हे दौंडकरांच्या दृष्टीने अभिमानास्पद असल्याचे सांगितले.

वरील बाबींवरून दौंडचे आमदार राहुल कुल यांना मुख्यमंत्र्यांजवळ किती मान आहे आणि त्यांच्या शब्दाला किती किंमत आहे हे यावरून स्पष्ट होत असून आता दौंड तालुक्यातील सर्व धनगर, माळी बंधावांसह इतर लोकांनीही राहुल कुल यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे असे आवाहन आनंद थोरात आणि महेश भागवत यांनी शेवटी केले आहे.

Visit  :Policenama.com