सततच्या पावसामुळे नीरा परिसरातील पशुधन धोक्यात, शेळ्या- मेंढ्यांना जंतुसंसर्गामुळे आजार

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यामध्ये परतीचा पाऊस खुप दिवस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं. अनेक ठिकाणची शेती वाहून गेली. आलेलं पिक ही गेलं. शासनाने त्याचे पंचनामे केले. मात्र याचबरोबर शेतकऱ्यांचे पशुधन ही धोक्यात आलं आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात पडलेल्या सततच्या पावसामुळे शेळ्या-मेंढ्यांना फुटरोट या विषाणूजन्य रोगाची लागण झाली आहे. यामुळे मेंढपाळाच्या कळपातील अनेक शेळ्यामेंढ्या बाधित झाल्या असून निरा परिसरातील राख, नावळी, गुळूंचे, कर्नलवाडी, पिसुर्टी आदी भागातील मेंढपाळांच्या मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत तर काही मेंढपाळांना आपली जनावरे कवडीमोल भावाने विकावी लागली आहेत. यामुळे येथील मेंढपाळांंचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
Neera
सतत पडणाऱ्या पावसामुळे अशा प्रकारचे आजार या जनावरांना होत असतात. यामध्ये जनावरांच्या पायांना जखमा होतात. या जखमा सतत वाढत गेल्यास जनावरांना चालता येत नाही. त्यामुळे त्याच्या खाण्यापिण्यावर परिणाम होतो. पर्यायाने आजार बळावर गेल्यास उपासमार होऊन अशी जनावरे मृत्युमुखी पडतात. शासनाच्या वतीने या काळात खबरदारी घेऊन लोकांचे नुकसान होऊ नये म्हणून उपाययोजना करणे गरजेचे असते. मात्र मेंढपाळांना याबाबत काहीच माहिती नसल्याने ते मेडिकल स्टोअर्समधून औषध आणून स्वतःच औषधोपचार करतात. काही लोकांनी लाळ आजार समजून औषध उपचार केले. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. त्यामुळे अनेकांना आपल्या कळपातील दहा ते वीस बकरी गमवावी लागली.

याबाबत पोलीस पाटील दिपक जाधव यांनी पशुवैद्यकीय विभागाशी संपर्क साधून उपाययोजना करण्याचे कळवले. यानंतर गुळूंचे येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी धनगर पाड्यावर जाऊन पाहणी केली. असता हा लाळ किंवा खुरवंत रोग नसून तो एक संसर्गजन्य आजार असल्याचे त्यांनी सांगितले. योग्य उपचार घेतल्यास हा आजार लगेच बरा होतो असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मेंढ्यांबरोबर शेळ्या, बोकडांसह इतर पशुधनांनाही जंतूसंसर्ग आजार झाला आहे. त्यामुळे जि.प.च्या पशुसंवर्धन विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच बाजारात मटणाच्या दरात भरघोस वाढ झाली आहे.

दिपक जाधव (पोलिस पाटील, गुळूंचे ) म्हणाले, “गुळूंचे आणि परिसरात झालेल्या अतिवृष्टी सारख्या पावसाने अनेक मेंढ्यांना रोग आल्यामुुुळे आपण कवडीमोल भावाने मेंढ्या विकत असल्याचे मेंढपाळांकडून समजले. यानंतर पशुवैद्यकीय विभागाशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाहणी करून रोगनिदान केले आहे.”

प्रकाश सुर्यवंशी (पशुवैद्यकीय अधिकारी) म्हणाले, “गुळूंचे परिसरातील शेळ्यामेंढ्या सतत पावसात भिजत असल्याने त्यांचे पाय सतत ओले असतात . त्यामुळे त्यांच्या नखातील कातडी मऊ होते. यामध्ये जंतुसंसर्ग होतो. त्याचबरोबर कातडीला लाकडे किंवा गवत पोचल्याने जखमा होतात. या भागात या जनावरांना झालेला रोग हा लाळ नसून फुटरोट हा जिवाणूचा विषाणूवन्य आजार आहे. शासकीय दवाखान्यात याबाबतची औषध उपलब्ध असून मेंढपाळानी येथुन औषध घ्यावीत.”

Visit : Policenama.com